बेसावध राहिल्यास पाकिस्तानसारखी स्थिती होईल
। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप बाबत इशारा दिला आहे. भारतीय संघ बेसावध राहील्यास पाकिस्तानच्या संघासारखी स्थिती होऊ शकते, असे ते म्हणाले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दुलीप ट्रॉफीचे आयोजन करणे सुनील गावस्कर यांनी सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. भारतीय संघ पुढील साडेचार महिन्यात 10 कसोटी सामने खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलबाबत गावस्कर म्हणाले की, भारताला किमान 55 सामने जिंकावे लागतील आणि ते सोपे नसेल.
दुलीप ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे गोलंदाज खेळायला हवे होते, असे सुनील गावस्कर यांनी मिड-डेमधील स्तंभात लिहिले आहे. कारण सेकंड स्ट्रिंग गोलंदाजांविरुद्ध कोण चांगला फलंदाज आहे हे शोधणे फार कठीण आहे. कारण सर्वोत्तम फलंदाज कोण हे निवडकर्त्यांना कळणार नाही. जसप्रीत बुमराह,मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा दुलीप ट्रॉफीमध्ये खेळले नाहीत हे लक्षात ठेवा. सिराज आणि जडेजा यांना नंतर संघातून रिलीज करण्यात आले. तर अश्विन आणि बुमराह यांची निवड केली नाही. मोहम्मद शमीदुखापतीतून सावरत आहे.
सुनील गावस्कर पुढे म्हणाले, बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी दुलीप ट्रॉफीचे आयोजन करणे हे बीसीसीआयने उचललेले सर्वोत्तम पाऊल आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी तयारी शिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेला जाणे सोपे नसते, मग विरोधी संघ कोणीही असो. पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेश संघाने दाखवून दिले आहे की, ते काय करू शकतात. काही वर्षांपूर्वी भारताने बांगलादेशचा दौरा केला तेव्हाही बांगलादेशी खेळाडूंनी त्यांना कडवी टक्कर दिली होती.
सुनील गावस्कर यांनी पुढे लिहिले की, आता पाकिस्तानविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर ते भारताचा सामना करण्यास तयार आहेत. त्यांच्याकडे काही उत्कृष्ट खेळाडू आणि काही नवीन खेळाडू आहेत. ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना विरोधी संघाची भिती वाटत नाही. आता त्यांच्याविरुद्ध खेळणार्या प्रत्येक संघाला हे माहीत आहे की त्यांना साधारण समजू शकत नाही, अन्यथा पाकिस्तानसारखी परिस्थिती होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.