मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आमदार रमेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ऐरोली, नवी मुंबई येथे उभारण्यात येणार्या कोळी भवन या नवीन वास्तूचा भूमीपूजन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 22 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता ऐरोली, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे.
याबाबत माहिती देताना रमेश पाटील यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून नोकरी, शिक्षण, हॉस्पिटल अशा विविध कामानिमित्त मुंबई शहरात येणार्या सर्वसामान्य आदिवासी कोळी व मच्छिमार बांधवांकरिता आणि विविध स्पर्धांच्या तयारीकरिता ग्रामीण भागातून येणार्या कोळी समाजातील युवक-युवतींना राहण्याची सोय व्हावी, त्याचप्रमाणे नवी मुंबईतील भूमीपुत्र-प्रकल्पग्रस्त, कोळी-आगरी बांधवांच्या सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांकरिता कोळी महासंघाच्या माध्यमातून रु. 20 कोटी खर्च करून नवी मुंबई येथे भव्य असे कोळी भवन उभारण्यात येत आहे. तसेच या नवीन वास्तूचा भूमीपूजन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचे सांगितले. तसेच या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याकरिता राज्यातील सर्व आदिवासी कोळी व मच्छिमार बांधवांनी आणि नवी मुंबईतील भूमीपुत्र-प्रकल्पग्रस्त, कोळी-आगरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे सर्व समाज बांधवांना आवाहन केले आहे.