| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील तळा नगरपंचायत कार्यालयात उद्या शनिवारी (दि. 21) सकाळी अकरा वाजता पाणीपुरवठा योजनेबाबत कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तळा शहरासाठी 13 कोटी 70 लक्ष रुपयांची पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. या पाणी योजनेला 5 डिसेंबर 2023 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती व कार्यादेश दिनांकापासून 18 महिन्यांचा कालावधी कामासाठी देण्यात आला होता. मात्र, आठ महिने उलटूनही काम संथ गतीने सुरू असल्याने सद्यःस्थितीत सदर योजनेचे काम कोणत्या टप्प्यात आहे यासह पाणीपुरवठा प्रकल्पाचे इस्टिमेटची प्रमाणित प्रत मिळावी व यासाठी तळा नगरपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका तथा गटनेत्या अॅड. दिव्या रातवडकर यांनी मुख्याधिकार्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्याची दखल घेऊन मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांनी अकरा वाजता नगरपंचायत कार्यालयात तळा पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला पाणीपुरवठा योजनेतील संबंधित इंजिनिअर व ठेकेदार यांच्याकडून सद्यःस्थितीत सुरू असलेल्या कामाबाबत माहिती सांगण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.