| तळा | वार्ताहर |
स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक उन्नती साधता येते, असे विचार रायगडभूषण पुरुषोत्तम मुळे यांनी व्यक्त केले. ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यशाळेप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर बँक ऑफ इंडिया तळा शाखाप्रबंधक नंदू चितळे, बोरघर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका किरण काप, संचालिका रुबीना परदेशी, हसंनमिया परदेशी हे उपस्थित होते. तर तालुक्यातील दीडशेच्या वर महिला उपस्थित होत्या.
पीएम विश्वकर्मा योजना 20 सप्टेंबर 2023 पासून सुरू करण्यात आली. तिला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीचे औचित्य साधून बोरघर हायस्कूल येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत टेलरिंग, ब्युटी पार्लर, गवंडी, लोहार, सुतार, वेल्डिंग, प्लंबिंग, कासार यासारखे जवळपास 15 कोर्स आपण करू शकतो. आज रुबीना परदेशी यांच्या माध्यमातून आपणास टेलरिंग व ब्युटी पार्लर या कोर्स ट्रेनिंग दिले जात आहे. आपण हे ट्रेनिंग यशस्वीपणे पार कराल अशी आशा बाळगतो. यामध्ये 15 हजार रुपयांपर्यंतचे किट आपणास मिळणार आहे. तर, व्यवसायासाठी तीन लाखांपर्यंत कर्ज विनागॅरंटी अल्प व्याजदरात मिळणार आहे. अशा व्यवसायामधून महिला स्वतः रोजगार तयार करून आर्थिक स्वावलंबी जीवन जगू शकतात. त्यांना परावलंबी राहण्याची गरज भासणार नाही. एका कुटुंबात पती-पत्नी असे दोघे कमविते असतील तर कुटुंबाचे आर्थिक शोषण होणार नाही. ती महिला कुटुंबाचा आर्थिक आधार बनू शकते. तेव्हा पीएम विश्वकर्मा या योजनेंतर्गत असणार्या विविध कोर्सचा लाभ तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त घ्यावा, असे विचार पुरुषोत्तम मुळे यांनी व्यक्त केले.
यावेळी किरण काप यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी सांगून बोरघर हायस्कूल हे केंद्र आहे. तालुक्यातील महिला या ठिकाणी येऊन या कोर्सचा लाभ घेत आहेत. परंतु, जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा फायदा घेतला, तर महिला स्वतःच्या पायावर उभी राहून कुटुंबाला मदत करू शकते, असे सांगितले. तर संचालिका रुबीना परदेशी यांनी या योजनेची पूर्ण माहिती महिलांना दिली. आज आपण टेलरिंग व ब्युटीपार्लर हे दोनच कोर्स सुरू केलेले आहेत. भविष्यात आणखीन काही कोर्स सुरू करता येतील. त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेतला पाहिजे. तळे तालुक्यात आपण सर्वांनी या योजनेची माहिती महिलांना दिली पाहिजे. यामधून महिलांचा उत्कर्षच होणार आहे. तुमच्यासाठीच हि योजना आहे. आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आर्थिक निधी 15 हजार रुपये किट साठी उपलब्ध होणार आहेत. प्रारंभी आवश्यक साहित्य घेण्यासाठी आणि मोठ्या व्यवसायासाठी बँक ऑफ इंडियामार्फत कर्ज पुरवठा देखील होणार आहे अल्प व्याजदराने. तेव्हा महिलांनी आपला आर्थिक विकास साधण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. शेवटी रुबीना परदेशी यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचे सांगता करून ऑनलाईन मार्गदर्शन केले. तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.