सुभेदार मायनाक भंडारी यांना अभिवादन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे अलिबागमध्ये शिवआरमार पहिला विजय दिवस गुरुवारी (दि.19) साजरा करण्यात आला. यावेळी स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख सुभेदार मायनाक भंडारी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. अलिबागमधील मेटपाडा येथे हा कार्यक्रम पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या काळात शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची नव्याने उभारणी केली. अनेक किल्ल्यांचे पुनरुज्जीवन केले. याच किल्ल्यांच्या सहाय्याने आदिलशहा, कुतुबशहा, पोर्तुगीज, मोगल तसेच बलाढ्य इंग्रज यांच्या साम्राज्याला महाराजांनी शह दिला. किल्ले हे महाराष्ट्राचे भूषण व स्फूर्तिस्थान बनलेले आहेत. या किल्लयांचा इतिहास जाणून घेतल्याने प्रेरणा मिळते. त्यापैकीच एक अलिबाग तालुक्यातील खांदेरी जलदुर्ग किल्ला आहे. स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख सुभेदार मायनाक भंडारी यांनी छत्रपती शिवरायांनी समुद्रमार्गे येणार्या परकीय शत्रुंचा धोका ओळखून 1658 साली स्वराज्य आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. जंजिरेकर सिद्धी, रेवदंड्याचे पोर्तुगीज, डच, मुंबईकर इंग्रज या परकीय शत्रूंपासून असणारा धोका ओळखून मुंबईपासून जवळच असलेल्या खांदेरी बेटावर किल्ला उभारण्याचे ठरवले. तो उभारण्याची जबाबदारी सुभेदार मायनाक भंडारी यांच्यावर सोपवली. मायनाकांनी आपल्या कडव्या शिलेदारांच्या साहाय्याने ती जबाबदारी स्विकारून दिवसा युद्ध आणि रात्रीत किल्ल्याचे बांधकाम, अशा रितीने किल्ला उभारून स्वराज्य आरमाराचे ठाणे निर्माण केले.
400 वर्षांची नाविक परंपरा असलेल्या आणि तोवर नाविक युद्धात अपराजित असलेल्या ज्यांनी पुढे सव्वाशे वर्षे भारतावर सार्वभौम सत्ता गाजवली त्या इंग्रजांचा जगाच्या इतिहासातील पहिला आरमारी पराभव 19 सप्टेंबर 1678 रोजी पहिले आरमार प्रमुख सुभेदार मायनाक भंडारी यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली खांदेरी युद्धा दरम्यान केला. सुभेदार मायनाक भंडारी आणि त्यांच्या शिलेदारांच्या शौर्य, कर्तृत्व, पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी 19 सप्टेंबर हा शिवआरमार पहिला विजय दिवस अलिबागमध्ये साजरा करण्यात आला. तसेच, खांदेरी युद्धादरम्यान ब्रिटिशांचा जगाच्या इतिहासातील पहिला पराभव केलेला 19 सप्टेंबर हा शिवआरमार विजयी दिवस म्हणून सरकारतर्फे खांदेरी किल्ला येथे राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात यावा, अशी मागणी भंडारी बहुउद्देशिय सामाजिक संस्थेने केली आहे.
यावेळी नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, कित्ते भंडारी हितवर्धक मंडळ रेवदंडा-चौलचे अध्यक्ष सुरेश खोत, कित्ते भंडारी हितवर्धक मंडळ अलिबागचे उपाध्यक्ष कमलाकर पडवळ, संतोष किर, शास्त्रीनगर-खारगल्ली भंडारी समाज अध्यक्ष महेश पाटील, तसेच भंडारी बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.