पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आवाहन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारत देशामध्ये अनेक जाती धर्माची मंडळी आहेत. स्वातंत्र्यासाठी सर्व जाती, धर्मातील मंडळींनी एकत्र येऊन लढा दिला. त्यामध्ये सर्वांचे योगदान मोलाचे राहिले आहे. प्रत्येक समाजात चांगली लोक आहेत. ते पुढे येणे, एकत्र येणे आवश्यक आहे. सण, उत्सव एकत्रित साजरे करण्याची परंपरा देशासह रायगड जिल्ह्याला लाभली आहे. यातून जातीय सलोखा राखण्याची परंपरा जपली आहे. ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.
जमाते मुस्लिमिन चावडी मोहल्ला अलिबाग यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ईद मिलाद उन नबीचा कार्यक्रम नुकताच चावडी मोहल्ला येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विनित चौधरी, अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे आदी मान्यवरांसह चावडी मोहल्ला अलिबाग अध्यश नसीम बुकबायंडर, उपाध्यक्ष वाशिम साखरकर, सचिव डॉ. साजिद शेख, सहसचिव मुज्जफर पल्लावकर, अशरफ घट्टे, असीम पालकर, नवशिन पटेल, अझहर घट्टे, अदनान पल्लवकर आणि मजहर भालदार आणि मांडवी मोहल्ला अलिबाग अध्यक्ष फारूक सय्यद व दानिश शेख आणि अलिबाग मधील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.