व्यावसायिकांची चिंता वाढली
| मुरूड | वार्ताहर |
कोकणात पर्यटनाचा हंगाम सुरू झाला असला तरी मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद बीचवर पर्यटक येत नसल्याने बीच सुनसान दिसून येत आहेत. मंगळवारी (दि. 24 ) रोजी सकाळी काशीद बीचवर छायाचित्र घेतले असता एकही पर्यटक दिसून आला नाही. हंगाम असूनही पर्यटन येत नसल्याने येथे एवढा सुनसानपणा धक्कादायक आणि प्रथमच दिसून आल्याचे काशीद येथील सूर्यकांत जंगम यांनी सांगितले.
गेल्या रविवारी जेमतेम 100 ते 150 पर्यटक आले होते; परंतु सोमवार, मंगळवार रोजी सकाळी फेरफटका मारला असता एकही पर्यटक काशीद बीचवर दिसून आला नसल्याचे श्री जंगम यांनी सांगितले.यामुळे निव्वळ पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणार्या स्टॉल्सधारक,घरगुती निवास, हॉटेल्स, लॉजिंग, छोटे दुकानदार यांची आर्थिक अवस्था म ना इस घटका ना उस घटका मअशी बिकट बनली आहे. पितृपक्ष सुरू असला तरी दरवर्षी येणारे पर्यटक गणेशोत्सवानंतर येत असतात असा आमचा अनुभव आहे.परंतु यंदा याच्या उलटी परिस्थिती असल्याने आलेल्या परिस्थितीला तोंड दिल्या शिवाय दुसरा पर्याय नाही अशा प्रतिक्रिया व्यवसायिकांनी व्यक्त केल्या. पावसाळयात काशीद बीच तीन महिने बंद असतो. याकाळात लॉजिंग आवारात गवत, झाडी झुडपे वाढून अस्वछता वाढलेली असते.आम्ही नव्या पर्यटन हंगामात प्रथम पैसे खर्चून स्वछता करून घेऊन पर्यटकांची प्रतिक्षा करीत असतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची वर्दळ सुरू झाली असताना प्रसिद्ध काशीद बीचवर पर्यटकांचा शुकशुकाट का ? असा प्रश्न आम्हास पडला आहे.काशीद बीच वरील स्टॉल धारक संदेश चंद्रकांत रिकामे यांनी मागणी करताना सांगितले की, पावसाळ्यात बंद असलेल्या काशीद बिचवरील बोटिंग आदी जल करमणुकीच्या सुविधा त्वरित सुरू केल्या जाव्यात.जंजिरा जलदुर्ग देखील खुला करावा. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी देखील पर्यटक येत नसल्याने मोठी नामुष्कीची वेळ आली आहे. सुरू झाडांच्या सानिध्यात विसावलेला काशीद समुद्र बीच अतिशय सुंदर असून पर्यटन हंगामात लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. काशीद बीच प्रमाणेच मुरूड बीचवर देखील पर्यटक नसल्याने पर्यटन व्यवसाय ठप्प आहे.