स्थानिकांनी दिला चोप
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत शहरातील श्रीराम पुलाच्या परिसरात कर्जत नगरपरिषदेच्या जागेत अनधिकृतपणे टपरी लावण्यात आली आहे. ती अनधिकृत टपरी चालविणार्या चालकाने शालेय मुलींची छेड काढली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या टपरी चालकाला चोप दिला. पालिकेने अद्याप अनधिकृत टपरी जप्त करण्याची कार्यवाही केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कर्जत श्रीराम पुलावर असलेल्या अनधिकृत टपरीधारकाकडुन बेकायदेशीर गुटख्यासह तंबाखु, विडी, सिगारेट यांची विक्री होत असुन सदर विक्रेता गांजा सारखा अंमली पदार्थ देखील विक्री करत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. तसेच हा परप्रांतीय विक्रेता व त्याचे परप्रांतीय साथीदार या अनधिकृत टपरीमध्ये बसुन दारु पिऊन शेजारीच असलेल्या बस स्टॉपमध्ये बसची वाट पाहत असलेल्या शालेय मुलींची छेडछाड काढत असतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी व श्रीराम पुलावर असलेल्या रिक्षाचालकांनी त्यांना अनेकदा समज दिली होती. तरी देखील परप्रांतीय विक्रेता दारुच्या नशेत शालेय मुलींची छेड काढत होता. म्हणून स्थानिकांनी त्याला चोप दिला.
त्या अनधिकृत टपरी बद्दल प्रभाकर गंगावणे यांनी कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विभा गारवे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर मुख्याधिकारी गारवे यांनी देखील तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि नगरपरिषदेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे बाळा निकाळजे यांना सदर ठिकाणी असलेली अनधिकृत टपरी हटविण्यास पोहचले. पालिका कर्मचारी हे अनधिकृत टपरी हटविण्यासाठी तातडीने घटनास्थळी गेले होते परंतु, सदर टपरीधारक टपरी बंद करून पसार झाला आहे. त्यामुळे पालिका आता ती बेकायदेशीर टपरी एक दोन दिवसात तिथुन हटवणार असल्याचे आश्वासन नकाळजे यांनी दिले आहे.