समाज माध्यमावर व्हीडीओ व्हायरल, चौकशीची मागणी
| उरण | वार्ताहर |
तालुक्यातील कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असलेल्या एका ग्रामपंचायतीच्या सफाई कामगाराला समुद्र किनारी साफसफाई करताना अमेरिकन डॉलर सापडले. याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलिस यंत्रणेनी याची शहानिशा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
समुद्रकिनारी कामगार साफसफाई करीत होता. तेव्हा त्याला तेथे अमेरिकन डॉलर सापडले असल्याचे समजते. सदर कामगार अशिक्षित असल्याने त्यांने हे डॉलर ग्रामपंचायतमधील राजकीय नेत्यांच्या हातात दिल्यानंतर डॉलर खरे असल्याची ओळख पटवून घेतली. त्यानंतर त्यांनी कामगाराला दमदाटी करीत चालते केले. त्या डॉलरवर कब्जा करून ते परस्पर वठविले असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ग्रामपंचायत सफाई कामगाराला अमेरिकन डॉलर सापडूनही त्याची फसवणूक करून काही राजकीय नेत्यांनी ते परस्पर लाटले असल्याचे बोलले जात आहे. याची माहिती सफाई कामगाराला होताच त्यांनी विचारणा केली असता त्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याबाबत योग्य तो खुलासा झाला नाही तर आपण स्वतः याची माहिती पोलीस ठाण्यात देऊन लवकरच भांडाफोड करणार असल्याचे कामगाराने सांगितले. तरी सदरच्या व्हायरल व्हाट्सएपची पोलिसांनी शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.