। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील किरवली ग्रामपंचायतीमधील ज्ञानदीप सोसायटीमधील दोन बंगल्यांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्ररी दाखल झाल्या असून सोन्याचांदीचे दागिने आणि काही रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.
किरवली ग्रामपंचायत हद्दीत येणार्या ज्ञानदीप सोसायटी येथील दोन बंगल्यात घुसून अज्ञात चोरट्यांकडून चोरी करण्यात आली. ज्ञानदीप सोसायटी येथील जया रेडकर यांच्या बंगल्याची खिडकी तर अर्जुन राणे यांच्या बंगल्याच्या दरवाज्याची लॉकची कडी तोडून आतमध्ये शिरकाव करीत या दोन्ही बंगल्यातून सोने, चांदी यांसह रोख रक्कम घेऊन चोरटे लंपास झाले.
जया रेडकर यांचा श्रद्धा बंगला असून त्या संध्याकाळी त्यांच्या क्लिनिकमधून ज्ञानदीप सोसायटी येथे बंगल्यावर आल्यानंतर घरातील सर्व कामे उरकून अंदाजे आठ वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांकडे गेल्या होत्या. दुसर्या दिवशी सकाळी ज्ञानदीप सोसायटी येथील बंगल्याकडे आल्यानंतर त्यांच्या बंगल्याची समोरील खिडकी ही उघडी असल्याचे पाहिल्यानंतर त्या मुख्य दरवाजा उघडून आत गेल्या असता बेडरूममधील सर्व सामान व साहित्य हे अस्ताव्यस्त झाल्याचे पाहिले. जया रेडकर यांचे सोने, चांदी व रोख रक्कम चोरीला गेली असल्याची माहिती रेडकर यांच्याकडून सांगण्यात आली आहे.
अर्जुन राणे यांच्या मालकीचा बंगला असून गेल्या 10 वर्षांपासून ते या ठिकाणी राहत असून त्यांचा स्वतःचा हॉटेल व्यवसाय आहे. ते नेहमीप्रमाणे हॉटेलवर गेल्यानंतर काम उरकून 10 वाजता घरी परत आल्यावर त्यांनी बंगल्याचे गेट उघडून दरवाजाजवळ गेलेअसता दरवाजाच्या लॉकची कडी तुटलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर दरवाजा ढकलला असता उघडला नाही म्हणून मागच्या दरवाजाने घरात शिरून पाहिले असता घरात काहीतरी प्रकार घडल्याचे लक्षात आले म्हणून बंगल्यातील सर्व बेडरूम चेक केले असता आतमध्ये असणार्या कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोने, चांदी यांसह रोख रक्कम चोरट्यांनी चोरी करून मागच्या दरवाजाने प्रसार झाले. कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत असून चोरांच्या मुसक्या आवळण्याचे कर्जत पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.