समुद्रकिनारे, महामार्गांवर गर्दीच गर्दी
| अलिबाग | प्रतिनिधी |
वर्षअखेर व नववर्षाचे स्वागत करण्यासाइी राज्यासह परराज्यातून पर्यटकांनी रायगड जिल्ह्याकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली असून, किल्ले, समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. अलिबाग, मुरुड-जंजिरा, काशिद, हरिहरेश्वर, माथेरान तसेच रायगड किल्ला परिसरात हॉटेल्स व कॉटेजेस जवळपास हाऊसफुल्ल झाली असून, शेवटच्या क्षणी आलेल्या पर्यटकांना मुक्कामासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, वर्षअखेरीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. मात्र, वाढलेल्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
मुंबई-पुणे व उपनगरांतून मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाल्याने महामार्गांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. समुद्रकिनाऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत पर्यटकांचा जल्लोष सुरू असून, पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. नववर्षाच्या जल्लोषात रायगड जिल्हा पर्यटनाने बहरला असला, तरी गर्दीचे नियोजन व सुरक्षित पर्यटन हेच यंदाचे मोठे आव्हान ठरत आहे.
सुरक्षेवर दृष्टिक्षेप
पोलीस बंदोबस्त वाढवला : समुद्रकिनारे, हॉटेल परिसर, महामार्ग व अंतर्गत रस्त्यांवर विशेष पथके.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज : रुग्णवाहिका, समुद्रकिनारी लाईफगार्ड तैनात.
वाहतूक नियंत्रण : जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पर्यटन मार्गांवर बंदोबस्त
नववर्ष साजरं करण्यासाठी रायगडसारखी निसर्गरम्य जागा दुसरी नाही. दरवर्षी कुटुंबासह येतो. यंदा गर्दी आहे, पण वातावरण खूप उत्साही आहे.
-अभिजीत साने,
पर्यटक, मुंबई
हॉटेल्स हाऊसफुल्ल असल्यामुळे मुक्कामासाठी जागा मिळवताना त्रास झाला. पण, समुद्रकिनारे आणि किल्ल्यांवरील अनुभव अविस्मरणीय आहे.
-कुणाल देवकर,
पर्यटक, पुणे
वर्षअखेरच्या गर्दीमुळे व्यवसायाला मोठा फायदा झाला आहे. मागील काही वर्षांपेक्षा यंदाची गर्दी सर्वाधिक आहे. वाढलेल्या गर्दीमुळे तारांबळ उडत आहे. परंतु, उत्साहसुद्धा आहे.
-रमेश खोत,
हॉटेल व्यावसायिक, मुरुड







