शेकाप अलिबाग तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष वेदांत कंटक यांची मागणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग तालुका विद्यार्थी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. सरकारने आंदोलनकर्त्यांशी तातडीने चर्चा करून त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी संघटनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष वेदांत दिलीप कंटक यांनी केली.
दिल्लीतील आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत पाठिंबा दर्शविला असून, पक्षाचे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांनीही आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्याच भूमिकेला पाठिंबा देत शेकापच्या अलिबाग तालुका विद्यार्थी संघटनेनेही आंदोलनाच्या समर्थनार्थ आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी वेदांत कंटक म्हणाले, “भारत हा लोकशाही आणि संविधानावर चालणारा देश आहे. प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे सरकारने संवेदनशीलतेने पाहून सकारात्मक संवाद साधावा. सोनम वांगचुक यांनी उपस्थित केलेले मुद्दे तसेच संघटनेच्या मागण्यांवर सरकारने गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा.”
ते पुढे म्हणाले की, “भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत राहून अलिबाग तालुका विद्यार्थी संघटना या लोकशाही आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आंदोलनकर्त्यांच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित चर्चा सुरू करावी.” यावेळी शेकाप विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत लोकशाही मार्गाने संवादातून प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले.






