नगरपरिषदेची धडक कारवाई
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहर बचाव समितीच्यावतीने कर्जतच्या विविध समस्यांबाबत कर्जत नगरपरिषदेला बुधवारी निवेदन देण्यात आले होते. आणि, हे निवेदन देत असताना त्या सर्व समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेला दोन दिवस म्हणजे शनिवारपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. या चार दिवसांत कर्जत शहर बचाव समितीच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे अॅड. कैलास मोरे यांनी जाहीर केले होते.
त्यामुळे जनआंदोलनाच्या धसका घेतल्यानं यापूर्वी नेहमी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारे कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे आणि इतर कर्मचारी कामाला लागल्याचे चित्र आज कर्जत शहरातील रस्त्यावरील अनधिकृत हातगाड्या हटवण्यासाठी पुढे आलेले दिसले.
कर्जत शहरातील बाजारपेठेतील रस्ता गेली अनेक वर्षे हरवला होता. अनधिकृत हातगाड्या, अनधिकृत रिक्षा स्टँड, रस्त्यात पार्क केलेल्या अस्ताव्यस्त गाड्या यामुळे ट्राफिकचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. नागरिकांना बाजारपेठेत चालणेदेखील मुश्किल झाले आहे. सणासुदीला तर बाजारपेठेतील ट्राफिकची समस्या तर अधिकच भयंकर असते.
कर्जत शहर बचाव समितीच्या आंदोलनाच्या एक दिवस आधीच कर्जत बाजारपेठेतील वाहतूक वन-वे करण्याचे फलक लावण्यात आले होते. तसेच दि.26 कर्जत नगरपरिषदेच्या वतीने अनधिकृत टपर्या हटविण्याचे काम सुरू केल्याने थोड्या प्रमाणात का होईना कर्जत बाजारपेठेतील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. आज सकाळी कर्जत नगरपरिषदेचे कर्मचारी कर्जत बाजारपेठेतील अनधिकृत टपर्या आणि रस्त्यात येणारी बोर्ड हटवण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन नगरपरिषदेची टीम बाजारात दखल झाली तेव्हा ही कारवाई किती दिवस करणार, का फक्त वेळ मारण्यासाठी आणि समोर आलेले आंदोलन शमविण्यासाठी केलेला प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.
कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन दिल्याने आणि त्या सोडविण्यासाठी दिलेला अवधी याची सांगड घालत कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गारवे आणि त्यांचे सर्व कर्मचारी त्या सोडविण्यासाठी सफल होतील का? की त्यांना जनआंदोलन आणि नागरिकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल? याचे उत्तर येणारा काळच ठरवेल.
कर्जत नगरपरिषदेने कर्जत बाजारपेठेतील अनधिकृत टपर्या हटवून रस्ता मोकळा करण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो; परंतु ही कारवाई तात्पुरती करून चालणार नाही, तर ती कायमस्वरुपी असली पाहिजे.
– कर्जत शहर बचाव समिती