आंबिया बहार हंगामात नुकसान झालेल्या शेतकर्यांना दिलासा
| रायगड | खास प्रतिनिधी |
आंबिया बहार 2023-24 हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेली 814 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिली आहे.
फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्यादृष्टीने मदत होईल, या हेतूने राज्यात हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविण्यात येते. कमी-जास्त पाऊस, कमी-जास्त तापमान, आर्द्रता, वेगाचे वारे, अवकाळी पाऊस, गारपीट अशा विविध हवामान धोक्यांमुळे फळ पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होते. यााबींचा विचार करून राज्यात आंबिया बहारमध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई या नऊ फळपिकांसाठी महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबविण्यात येते.
हवामान केंद्राच्या नोंदीनुसार नुकसान भरपाईची रक्कम निर्धारित केली जाते. यात 35 टक्क्यांपर्यंत एकूण विमा हप्ता असल्यास शेतकरी विमा संरक्षित रकमेच्या साधारण 5 टक्के व उर्वरित विमा हप्ता केंद्रासह राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते. 35 टक्के पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा हप्त्यात शेतकर्यांचा वाढीव वाटा 50 टक्के असतो. आंबिया बहार 2023-24 मधील राज्य शासनाचा एकूण विमा हप्ता हा 390 कोटी रुपये होता. पैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान रुपये 344 कोटी हे शासनाने मंजूर केले असून, ते विमा कंपनीला दिल्यानंतर केंद्र शासनाचे दुसरा अनुदान विमा कंपन्यांना प्राप्त होईल. या आंबिया 2023-24 हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेली नुकसानभरपाई 814 कोटी रुपये ही शेतकर्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत जमा करण्यात येणार आहे.