फ्रँचायझी 6 खेळाडूंना रिटेन करू शकणार
। बेंगळूरू । वृत्तसंस्था ।
इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यामागे मोठे कारण म्हणजे मेगा लिलाव आहे. हा मेगा लिलाव पूर्वीपेक्षा अधिक रोमांचक होणार आहे. या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन होणार असल्याने प्रत्येक संघात मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे. प्रत्येक फ्रँचायझीने सपोर्ट स्टाफमध्ये बदल करून त्यादृष्टीने पावलेही उचलले आहेत. आता याबाबत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वाची बैठक शनिवारी (दि.28) बेंगळूरू येथे पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये खेळाडूंचे रिटेंशन आणि राईट टू मॅच कार्ड अशा काही नियमांचा समावेश आहे. तसेच, पुढील मोसमासाठीचा मेगा लिलावात खेळाडूंची कमाई देखील वाढणार आहे.
राईट टू मॅच कार्ड हा पर्याय यापूर्वी 2018 आयपीएल हंगामाच्या लिलावात वापरण्यात आला होता. या पर्यायामुळे संघांना लिलावादरम्यान आपल्या संघात आदल्या हंगामात असलेल्या खेळाडूला पुन्हा संघात घेता येते. पण त्यांना लिलावात त्या खेळाडूला जितक्या रुपयांची बोली लागली आहे, त्याच किंमतीत त्याला संघात परत घ्यावे लागते. मिळालेल्या वृत्तानुसार, आयपीएलच्या बैठकीत फ्रँचायझींना 5 खेळाडूंना संघात कायम करता येऊ शकते. तसेच, यंदाच्या लिलावात एक राईट टू मॅच कार्डही वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तसेच, भारतीय नियामक मंडळाने इंडियन प्रीमिअर लीग 2025 ते 2027 साठी आठ महत्त्चा नियम जाहीर केले आहेत. यामध्ये आयपीएल फ्रँचायझी एकूण 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात. हे एकतर रिटेन्शनद्वारे किंवा राईट टू मॅच पर्यायाचा वापर करून असू शकतात. 6 रिटेन्शन्स मध्ये जास्तीत जास्त 5 कॅप्ड खेळाडू (भारतीय आणि परदेशी) आणि जास्तीत जास्त 2 अनकॅप्ड खेळाडू असू शकतात. 2025 साठी फ्रँचायझींसाठी लिलाव पर्सची किंमत 120 कोटी ठेवण्यात आली आहे. एकूण पगाराच्या कॅपमध्ये आता लिलाव पर्स, वाढीव वेतन आणि सामना शुल्क यांचा समावेश असेल. 2024 मध्ये एकूण वेतन कॅप (लिलाव पर्स + वाढीव कामगिरी वेतन) 110 कोटी होते, ते आता 146 कोटी (2025), 151 कोटी (2026) आणि 157 कोटी (2027) असे असतील.
अनेक खेळाडू करोडपती होणार
इंडियन प्रीमियर लीगच्या अनेक खेळाडू करोडपती होणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल मेगा लिलावासाठी खेळाडू कायम ठेवण्याचे नियम निश्चित केल्यामुळे हे घडणार आहे. बीसीसीआयच्या अधिकार्यांनी फ्रँचायझींच्या अपेक्षेनुसार आणि मागणीनुसार राखून ठेवल्या जाणार्या खेळाडूंची संख्या 4 वरून 6 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये 5 खेळाडू राखून ठेवणे आणि एक ’मॅचचा अधिकार’ समाविष्ट असेल. परंतु, 5 खेळाडू डायरेक्ट रिटेन्शनसाठी फ्रँचायझीला 75 कोटी रुपयांची मोठी रक्कमही खर्च करावी लागणार आहेत. कारण पहिल्या तीन खेळाडूंना अनुक्रमे 18, 14 आणि 11 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, जर फ्रँचायझींनी आणखी दोन खेळाडूंना संघात कायम केले, तर त्यांना 18 आणि 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
आयपीएलमधील ऐतिहासीक निर्णय
आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मॅच फी लागू करण्यात आली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार्या (इम्पॅक्ट प्लेअरसह) खेळाडूला 7.5 लाख प्रति सामना फी मिळणार आहे. ही त्याच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त असेल. परदेशी खेळाडूला मेगा ऑक्शनसाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणी न केल्यास तो पुढील वर्षी होणार्या लिलावासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे. लिलावात नोंदणी केल्यानंतर खेळाडूची निवड झाली आणि त्याने पर्व सुरू होण्यापूर्वी माघार घेतली, तर त्याला पुढील 2 पर्व लीगमध्ये भाग घेण्यास आणि खेळाडूंच्या लिलावात नाव नोंदवण्यास बंदी घालण्यात येणार आहे. भारतीय खेळाडू मागील पाच कॅलेंडर वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसेल तर तो कॅप्ड भारतीय खेळाडू अनकॅप्ड होईल. हे फक्त भारतीय खेळाडूंसाठी लागू असणार आहे.