राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इशाराची दखल
। पनवेल । वार्ताहर ।
कोट्यवधी रुपये खर्च करूनही वाहनांना खड्ड्यातून वाट काढत जावे लागत होते. त्याचबरोबर टायर फुटून आर्थिक नुकसान आणि जीविताच्या धोक्याला निमंत्रण देण्याची स्थिती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ब वर निर्माण झाली होती. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अॅड.तुषार पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत प्रकल्प अधिकार्यांना निवेदन दिले. यासंदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासांमध्येच खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अवजड आणि चार चाकी वाहन चालकांना काहीसा दिलासा रिळाला आहे.
जेएनपीटी हे देशातील सर्वात मोठ्या बंदरापैकी एक आहे. येथे मालाची ने आण करण्याकरिता अनेक ठिकाणाहून ट्रेलर कंटेनर ये-जा करतात. एकंदरीतच अवजड वाहनांची संख्या जास्त आहे. याकरता जवळपास 3000 कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग 4 बी चे रुंदीकरण करण्यात आले. त्याचबरोबर या मार्गिका काँक्रीट करण्यात आल्या. मुंबई- गोवा मुंबई- पुणे आणि इतर ठिकाणी जाण्याकरीता याच रस्त्याचा अवलंब केला जातो. त्याचबरोबर अटल सेतू मुळे काही मिनिटांमध्ये मुंबई गाठता येते. या सागरी मार्गावर जाण्यासाठी याच जेएनपीटी हायवेचा अवलंब करावा लागतो. यामुळे अवजड बरोबरच आता चार चाकी वाहनांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे मुंबई जवळ आली असल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ब वर ज्या ज्या ठिकाणी उड्डाण पूल आहेत. तेथे सिमेंट काँक्रीट करण्यात आले नसल्याने उन्नत मार्ग डांबरीचे आहेत. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने. टायर फुटण्याचे प्रकार घडत आहेत. मुंबई बाजूकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ला जोडल्या गेलेल्या उड्डाण पुलाच्या तोंडावर दोन अडीच फूट खड्डे पडल्याने त्यामुळे जवळपास 25 ते 30 वाहनांचे टायर फुटले. दुर्दैवाने कोणती जीवित हानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले आहे.
लवकरच काँक्रीटने खड्डे भरणार!
मेसर्स अशोक बिल्डकोन लिमिटेड या कंपनीने महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले. परंतु या एजन्सीचा कालावधी संपुष्टात आल्याने त्याचबरोबर जास्त पाऊस पडल्यामुळे दुरावस्था झाल्याचे उघड झाले आहे. प्राधिकरणाने ही गोष्ट मान्य सुद्धा केली आहे. यासाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान सद्यस्थितीत मेसर्स सी एस इंजीनियरिंग सर्विसेस यांच्यामार्फत पेवर ब्लॉक, जीएसबी मटेरियल व काँक्रीटने खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनी तुषार पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.