| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल परिसरात दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असून उष्णतेच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्याचा परिणाम केवळ नागरिकांवरच नव्हे तर प्राणी व पक्ष्यांवरही होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल येथील पांजरपोळमध्ये जनावरांच्या संरक्षणासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पांजरपोळमध्ये असलेल्या सुमारे 200 गुरांना उष्णतेपासून दिलासा मिळावा, यासाठी खास स्प्रिंकलर यंत्रणा बसविण्यात आली आहे.
या स्प्रिंकलरमधून सतत पाण्याची फवारणी होत असल्याने परिसरातील तापमान तुलनेने थंड राहत आहे. त्यामुळे गुरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळत असून जनावरे शांत व सुरक्षित वातावरणात राहत असल्याचे दिसून येत आहे. लहान वासरांसाठीही विशेष काळजी घेतली जात असून त्यांना पुरेसे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यात येत आहे. वाढत्या तापमानात जनावरांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी पांजरपोळ प्रशासन सतर्क असल्याचे सांगण्यात आले.
उन्हाळ्याच्या दिवसांत प्राणीमात्रांनाही माणसांप्रमाणेच संरक्षणाची गरज असते. पनवेल पांजरपोळने केलेली ही व्यवस्था सध्या नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे.







