1853 अवजड वाहनांवर कारवाई; 21 लाखांचा केला दंड वसुल
। चिरनेर । प्रतिनिधी ।
न्हावाशेवा वाहतूक पोलीस पथकाने रस्त्यावर बेकायदेशीर उभ्या असलेल्या आणि महामार्गांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करुन अपघातास कारणीभूत ठरणार्या अवजड वाहनांवर कडक कारवाईचा बडगा उगरला असून,मागील 7 महिन्यांपासून या न्हावाशेवा वाहतूक पोलिसांनी 1853 अवजड वाहनांवर कारवाई केली असून सुमारे 21 लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे.
जेएनपीए बंदर परिसरातील व जेएनपीए – पनवेल महामार्गासह मुंबई जोडणार्या न्हावा-शिवडी अटल सेतू महामार्गावरील अवजड कंटेनर ट्रेलर,टँकर व डंपर अशा वाहनांवर न्हावाशेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी.एम.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. जेएनपीए परिसरात केंद्र शासनाने सहा व आठ पदरी महामार्ग साकारले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आता विशेषतः जाणवत नाही.मात्र रात्रीच्या वेळी अवजड वाहनचालक बेशिस्त वाहन चालवित असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरूच ठेवण्यात आल्याने वाहन चालकांनी शिस्तीने योग्यतेने वाहन चालविणे पसंत केले असल्याचे जाणवत आहे.