दोन खलाशांचा बुडून मृत्यू
| सिंधुदुर्ग | वार्ताहर |
निवती समुद्रातून मच्छीमारी करून येत असताना निवती येथील मच्छीमार आनंद धुरी यांच्या मालकीची (धनलक्ष्मी) बोट समुद्रात पलटी होऊन दोन खलाशांचा मृत्यू झाला. या बोटीमध्ये एकूण चौदा खलाशी होते. ही घटना मध्यरात्री रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
सविस्तर माहिती अशी, शुक्रवारी (दि. 4) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास निवती येथील मच्छीमार आनंद धुरी यांच्या मालकीची असलेली बोट नेहमीप्रमाणे चौदा खलाशांना घेऊन समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीनंतर मासेमारी करून निवती समुद्राच्या किनारी परतीचा प्रवास करत असताना किनाऱ्याजवळ असलेल्या म्हणजेच, ज्या ठिकाणी समुद्र आणि खाडी एकत्रित येतात त्या ठिकाणीही दुर्घटना घडली. समुद्रकिनाऱ्यापासून 200 मीटर अंतर असताना ही दुर्घटना घडली. यातील चौदा खलाशांपैकी दोन खलाशांचा मृत्यू झाला. त्यात मृत्यू झालेले आनंद पुंडलिक पराडकर (58) हे श्रीरामवाडी येथील आहेत. पराडकरांचा मृत्यू बोट पलटी होऊन जाळ्यात अडकून राहिल्यामुळे झाला, तर दुसरे मृत व्यक्ती रघुनाथ उर्फ भाऊ येरागी खलाशी हे खवणे येथील आहेत, त्यांचे (48) वर्षे असून हे दोन्ही खलाशी बाजूच्या गावातील वेंगुर्ले तालुक्यातील आहेत. या मृत खलाशांची निवती पोलीस ठाण्यात नोंद असून त्यांना परुळे येथे शवविच्छेदनसाठी आणण्यात आले होते.