। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा यासाठी निवळीचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शनिवारी त्यांनी एकत्र येत रस्त्यावर उतरून प्रस्तावित उड्डाणपुलाचा प्रस्ताव बांधकाम विभागाने रद्द करावा, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी निवळी आणि हातखंबा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथून जाणार्या मिर्या-नागपूर महामार्गावर आजूबाजूच्या गावाच्या सुरक्षिततेसाठी अंडर पास व्हावा आणि मुंबई-गोवा महामार्गावर निवळी बाजारपेठेत होणार्या उड्डाणपूलाऐवजी सरळ महामार्ग व्हावा, अशी येथील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि छोट्या व्यवसायिकांची मागणी आहे. मिर्या-नागपूर महामार्गावर काही महिन्यांपूर्वी एक दुर्दैवी अपघात होऊन दोघेजण मृत्युमुखी पडले होते. तसेच, सातत्याने या भागात अपघात होत आहेत. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला लहानमोठी गावे आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी येथे महामार्गावर अंडर पास करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
मधल्या काळात विधानसभा निवडणुका असल्याने हे काम थांबले होते. मात्र, निवळीवासीय शनिवारी पुन्हा आक्रमक झाले असून दुपारी सर्वजण रस्त्यावर उतरले होते. यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष पाध्ये, संतोष डांगे, बंड्या कोकजे, सुरेश निवळकर, श्रीपद गावडे, सागवेकर, विश्राम तारवे, स्वस्तिक मालप, किरण मालप, ओमकार मालप, विठ्ठल मालप, सोहम कोकजे, पिंट्या मोहिरे, ऋषिकेश मुळे, विलास आंबेकर, श्रेयस रावणांग आदींसह ग्रामस्थ व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







