अधिकार्यांच्या हातात देणार खेळण्यातील माकड
| तळा | वार्ताहर |
तळा शहरासह तालुक्यामध्ये माकडांनी व जंगली प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला असून स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे लागत आहे. या गंभीर समस्येकडे वनविभागाचे, लक्ष वेधण्यासाठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली असूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. किंवा पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली नाही.
दिवसेंदिवस माकडांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे त्यांचे राहणीमान जंगल सोडून मानवी वस्तीत आल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुलांना एकट्याला सोडायची सोय राहिली नाही. या माकडांचा हैदोस इतका वाढला कि शेतकरीदेखील कुठल्या प्रकारची शेती करायला तयार होत नाही. काही ठिकाणी शेती पिकली तर पिके येईल याची खात्री नाही. तळा तालूका डोंगराळ दुर्गम असून भात शेती हा एकमेव उदरनिर्वाहाचे साधन असून रानडुक्कारांमुळे नासधुस होत आहे व माकडे भाजीपाला, फळफळावल कडधान्ये, कपडे, वाळवणे अन्नधान्ये चोरून किंवा पळवून नेत आहेत, घराची कौले काढून बंद घरात शिरून नासधुस करीत आहेत. या माकडांनी अतिशय उच्छाद मांडला असून या माकडांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशा मागणीसाठी तळा तालुक्याच्यावतीने तळा विकास आघाडीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे. येत्या 21ऑक्टोबर 2024 पर्यंत दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही तर तळा तालुका विकास आघाडी वन परिक्षेत्र अधिकारी माणगाव, वनपरिमंडळ अधिकारी तळा यांना खेळण्यातील माकड देऊन आंदोलन छेडणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.







