कर्मचार्यांच्या मनमानीपणाचा नागरिकांना त्रास
| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुका भूमीअभिलेख कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग, प्रभारी अधिकारी यामुळे या विभागात सध्या सावळागोंधळ सुरू आहे. त्यातच सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचार्यांच्या मनमानीपणामुळे या कार्यालयात येणार्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
महाड तालुक्याचा विस्तार मोठा आहे. भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रदेखील मोठे आहे. यामुळे येथील तालुका भूमीअभिलेख कार्यालयामध्ये सतत नागरिकांची वर्दळ असते. जमीन क्षेत्राशी संलग्नित असलेल्या कामांसाठी नागरिकांची गर्दी असते. त्यातच महाड तालुक्यामध्ये जमीन खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणावर असल्याने जमिनीशी संबंधित दाखले मिळवण्याकरिता तालुका भूमीअभिलेख कार्यालयामध्ये महाडसह मुंबई, पुणे, सूरत आदी शहरांमधील नागरिकांचा ओढा कायम असतो. गेले काही दिवसांपासून या ठिकाणी माणगाव येथील अधिकारी सोनार यांच्याकडे महाड कार्यालयाचा पदभार सोपवलेला आहे. हा पदभार प्रभारी असल्याकारणाने ते ठराविक दिवशी महाडमध्ये येत असतात. त्यातच अनेक कर्मचारी बदली झालेले असल्याने त्या जागी नवीन कर्मचारी दाखल झालेले नाही, यामुळे अपूर्ण कर्मचार्यांचा त्रास नागरिकांना होत आहे. एका-एका कामासाठी नागरिकांना वारंवार फेर्या माराव्या लागत आहेत. महाड तालुका भूमीअभिलेख कार्यालयामध्ये असलेल्या कर्मचार्यांकडून नागरिकांना मनमानी आणि उध्दटपणाचे वर्तन अनुभवास मिळत आहे, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
बिरवाडी येथील गणेश दाजी सावंत यांनी आपले एका जागेची रीतसर मोजणी करून मिळावी याकरिता अर्ज केला होता. अर्जानुसार तालुका भूमीअभिलेख कार्यालयाने गणेश सावंत यांच्याकडून जमीन मोजणीची रक्कम भरून घेतली. जमीन मोजणी करण्यासाठी तारीखदेखील देण्यात आली. मात्र, काही दिवसांनी तुमची जमीन मोजता येणार नाही, याकरिता हरकत घेण्यात आली असल्याचे सांगितले. त्यानुसार सावंत यांनी कार्यालयांमध्ये धाव घेतली असता ज्यांचे नाव कार्यालयातील कर्मचारी यांनी सांगितले असता त्या हरकत घेणार्या व्यक्तीचा सदरहू जमिनीशी कोणताच संबंध नसल्याचे किंवा चतुःसीमामध्येदेखील ते कुठेच नसल्याचे सावंत यांनी सांगितले. शिवाय, त्यांनी दिलेल्या अर्जावरदेखील अर्जदाराची सही नसल्याचे दिसून आले. याचा अर्थ, महाड तालुका भूमीअभिलेख कार्यालयामध्ये मनमानी सुरू असल्याची गंभीर तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे महाड तालुका चिटणीस गणेश सावंत यांनी केली आहे. तेथील कर्मचारी श्री. डोंगरे हे आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे निर्णय घेत असल्याचे आरोपदेखील त्यांनी केला. या ठिकाणी पूर्वी असलेले अधिकारी श्री. चौधरी यांची बदली झाल्यानंतर या ठिकाणी प्रभारी अधिकारी नेमण्यात आले आहेत. यांच्याकडून देखील समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.
भूमीअभिलेख कार्यालयामध्ये जमीन मोजणी प्रकरणांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. या ठिकाणी असलेले कर्मचारी कागदावर वजन ठेवल्यानंतर तात्काळ काम करून देत आहेत. यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. कार्यालयामध्ये त्यांना वारंवार फेर्या माराव्या लागत आहेत. फेर्या मारूनदेखील अनेक त्रुटी काढून त्यांना पुन्हा पुन्हा येण्याचा मानसिक त्रास दिला जात आहे. याबाबत शासनाने गंभीर दखल घेऊन सदर कार्यालयातील कर्मचार्यांची चौकशी करावी, अशी मागणीदेखील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते बापू दळवी यांनी केली आहे.