। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात शनिवारी (दि.12) तुफान पावसाची बॅटिंग पहायला मिळाली. तसेच, गोवे गावातील सात ते आठ घरांवर वीज पडून विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळलेला आहे.
कोलाड परिसरात शनिवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास वीज, वार्यासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे या परिसरातील नागरिकांची तारांबल उडाली होती. तसेच, या परिसरातील गोवे गावातील विजय जवके, विश्वास निकम, मारुती निकम, गणेश दहिंबेकर, यशवंत सुतार, दिलीप आंबेकर, अविनाश आंबेकर, कमलाकर सुर्वे यांच्या घरांवर वीज पडली. यामुळे त्यांच्या घरातील विद्युत उपकरणे, विद्युत बोर्ड व वायरींग जळल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, या वीजेमुळे विजय जवके यांच्या सौचालयातील पत्रे तुटून खाली पडले आहेत. तर, आंबेकर यांच्या घरातील एक महिला व मुलाच्या हाताला वीज घासून पडल्याने दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.