। पुणे । प्रतिनिधी ।
झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. जूनमध्ये पुण्यात पहिला रुग्ण आढळल्यावर त्यानंतर झिकाचे रुग्ण पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, दादर, सांगली या ठिकाणी देखील आढळून आले. आतापर्यंत राज्यात 138 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण पुण्यात असून त्यांची संख्या 108 इतकी आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुणे ग्रामीणमध्ये 9 रुग्ण आहेत. पुणे शहरात आतापर्यंत 1 लाख 71 हजार घरांची तपासणी केली असून 798 जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी 715 नमुने हे गर्भवती महिलांचे असून त्यातील 45 गर्भवती पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान या आजारासाठी रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नये. ताप आल्यास अंगावर न काढता दवाखान्यात जावे आणि उत्तम निदान सरकारी दवाखान्यात होत असल्याने उपचार घ्यावेत, असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.





