3 लाख 72 हजारांचा माल जप्त, तीन जणांना अटक
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री सुरू आहे. अनेक दुकान, टपरीवर हमखास गुटखा मिळतो. परंतु, हा गुटखा नेमका येतो कुठून याचा शोध अद्याप लागत नाही. नेरळ परिसरातील नेरळ-जिते येथे एका दुकान गाळ्यात गुटखा कारखाना सुरू असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती. या गुटखा कारखान्यावर नेरळ पोलिसांनी धाड टाकली असून तेथे त्यांना गुटखा मिळून आला आहे. गुटखा पॅकींग मशिन आणि एस.के.नावाचे गुटखा पॅकेट सापडले आहेत. याबाबत नेरळ पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नेरळ परिसरातील जिते परिसरात एका दुकान गाळयात गुटखा तयार करण्यात येत असल्याची गुप्त माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नेरळ पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली. तेथे त्यांना एस.के. गुटखा, गुटखा मशिन, गुटख्याच्या गोणी असा एकूण सुमारे 3 लाख 72 हजारांचा माल मिळून आला असून सर्व माल नेरळ पोलिसांनी जप्त केला आहे.
यात नेरळ पोलिसांनी राहुल गोविंद तिवारी((रा.इंदोर-मध्यप्रदेश), अक्षय बाबुराव गोविलकर (रा.बदलापूर-सोनिवली), विश्वनाथ रामप्रकाश प्रजापती (रा. उत्तरप्रदेश) व प्रविण परशुराम मोरगे (रा. कुडसावरे-ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून यातील तीन जणांना नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी नितीन मंडळीक करित आहेत.