| जम्मू-काश्मीर | वृत्तसंस्था |
जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागात रविवारी (दि.20) संध्याकाळी दहशतवाद्यांनी सात जणांची गोळ्या झाडून हत्या केली. मरण पावलेल्यांमध्ये दोन अधिकारी आणि तीन मजुरांचा समावेश आहे. याशिवाय एका स्थानिक डॉक्टरचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय आणि स्किम्स श्रीनगरमध्ये दाखल करण्यात आले आहे. बोगद्याचे बांधकाम सुरु असताना हा भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी भारतीय सैन्याने परिसरात नाकाबंदी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गांदरबल जिल्ह्यातील गुंड भागात बोगदा बांधण्याचे काम करत होते. या कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या खासगी कंपनीच्या कामगारांच्या तळावर दहशतवाद्यांनी रविवारी गोळीबार केला. ज्यामध्ये दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दोन दहशतवाद्यांचा हात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस आणि लष्कराने परिसराची नाकेबंदी केली आहे. मृत्युमुखी पडलेल्या सात जणांमध्ये बिहारमधील फहीमान नसीर (सेफ्टी मॅनेजर), मोहम्मद हनिफ आणि कलीम यांचा समावेश आहे, तर अनिल शुक्ला (मेकॅनिकल मॅनेजर), जम्मूचे शशी अबरोल, पंजाबचे गुरमीत सिंग आणि काश्मीरचे डॉ. शाहनवाज यांचा समावेश आहे. रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दलाचे एक पथक तसेच डीजीपीसह उच्च अधिकारीही घटनास्थळी उपस्थित असून परिसरात शोध मोहीम सुरू आहे.