शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अलिबागमध्ये होणार सभा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.22) सायंकाळी चार वाजता भव्य सभा आयोजित केली आहे. या सभेमध्ये आज शेकापचा उमेदवार ठरणार आहे.
अलिबाग विधानसभा मतदार संघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शेकापच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांमुळे शेतकरी कामगार पक्ष अलिबाग, मुरूड व रोहा मतदारसंघातील घराघरात पोहोचला आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार व दुर्बल घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने लढे दिले आहेत. विधानसभेसह विधान परिषदेच्या सभागृहात आवाज उठवून अन्यायग्रस्तांना न्याय दिला आहे. शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आणण्यासाठी या मतदार संघातील कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
गेले अनेक दिवस शेकापचा उमेदवार कोण असणार, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिल होते. ही उत्कंठा आता संपणार आहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांनी भव्य सभा अलिबागमध्ये घेण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अलिबागमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याची तयारीदेखील कार्यकर्त्यांनी केली आहे. शेकाप भवनसमोर भव्य सभा शेकाप नेते जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यासभेत ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून शेकापचा उमेदवारही जाहीर करणार आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहप तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी केले आहे.