बैलगाडी शर्यतीची आतापासूनच जाहिरातबाजी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आचारसंहितेचा भंग करणार्यांवर पोलीस व महसूल विभाग लक्ष देत आहे. मात्र, शिंदे गटातील आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थकाकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काशिद येथील सरपंच संतोष राणे यांनी नोव्हेंबरमध्ये होणार्या बैलगाडी शर्यतीचे फलक सोशल मीडियावर व्हायरल करून आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. याकडे जिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अलिबाग, मुरूड व रोहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. 4 नोव्हेंबरला अंतिम उमेदवार जाहीर केले जाणार असून, 20 नोव्हेंबरला मतदान व 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या कालावधीत मतदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न करणार्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठीत केली आहे. वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आल्या आहेत.
आचारसंहितेचा भंग करणार्यांविरोधात समितीमार्फत कारवाई केली जाणार आहे. तरीदेखील आमदार महेंद्र दळवी पुरस्कृत शिंदे गटातील काशिद येथील सरपंच संतोष राणे आयोजित 28 नोव्हेंबर रोजी होणार्या बैलगाडी शर्यतीची जाहिरात आतापासूनच सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. निवडणुकीत आमिष दाखविणारी जाहिरातबाजी करणे आचारसंहितेचा भंग असल्याचे निवडणूक अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व पोलीस प्रशासन यांची संयुक्त सायबर सेलची स्वतंत्र यंत्रणा तैनात केली आहे. दरम्यान, राणे यांनी सोशल मीडियावर केलेल्या जाहिरातीची पडताळणी करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी सांगितले.