। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व राजकीय पक्षात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठीच चढाओढ पहायला मिळत असून अनेक ठिकाणी बंडखोरीदेखील होत असलेली दिसत आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षात धमासान परिस्थिती आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागांवर राजकीय पक्षांनी अधिक लक्ष केंद्रित केले असून काही ठिकाणी आश्वासनांची खैरात केली जात असल्याचे दिसत आहे. परंतु, यावेळी तरुण उमेदवारांना अधिक प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातून येत आहेत.
आजच्या काळात तेच तेच उमेदवार स्वीकारायला नवीन पिढी तयार नाही असे स्पष्ट दिसून येत आहे. तरुण पिढीला सोशल मीडियामुळे आधुनिक भारताच्या विकासाची पाळेमुळे कळत आहेत. अनुभवी नेत्यांनी सल्लागार म्हणून मार्गदर्शन करताना नव्या पिढीकडे सूत्रे सोपवण्यात यावी असे तरुण पिढीला वाटत आहे. जनमताचा कौल महत्वाचा असल्याने प्राप्त परिस्थितीला जो पक्ष एकूणच विचार स्वीकारून करुन सामोरा जाईल तो भविष्यात यशस्वी होईल, अशा चर्चा होत आहेत.
तसेच, निर्भीड, सचोटी, धडाडीने कार्य करणार्या सुशिक्षित महिला राजकारणात आल्या पाहिजेत, असे मत सर्वत्र ऐकायला मिळत आहे. भारताच्या स्वातंत्र्य पूर्व काळात किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक महिलांनी राजकारणात अनेक पदे भूषविली आहेत. करवीर निवासिनी ताराऊ, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, कीतूरची राणी चलम्मा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय राजकारणातील नेत्या इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, शालिनीत पाटील, ममता बॅनर्जी, प्रतिभा पाटील, सुप्रिया सुळे, वसुंधरा राजे सिंदिया, मायावती, जयललिता, शीला दीक्षित, मिनाक्षी पाटील अशा अनेक महिलांनी राजकारणात येऊन प्रभावीपणे समाजकारण यशस्वी केलेले आपण पाहिले आहे. नवीन पिढीदेखील त्याचे अवलोकन करीत महत्व ओळखून आहे. राजकारणात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर महिला ध्येय गाठून सोनं करतील एवढा महिलांचा आत्मविश्वास आणि जिद्द नक्कीच आहे, अशा प्रतिक्रिया शहरी, ग्रामीण भागातील महिलांनी व्यक्त केल्या आहेत.