| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वारे मुसळधार पाऊस असो वा चक्रीवादळ याचा फटका महावितरणासह सर्वसामान्य जनतेला बसतो. वीजपुरवठा खंडित तर होतोच; शिवाय कोलमडलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वेळ, पैसा, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प दोन अंतर्गत पावस ते डोर्ले ही मुख्य वीजवाहिनी भूमीगत करण्याची मागणी डोर्लेतील सामाजिक कार्यकर्ते संतोष पोकडे यांनी केली आहे.
जिल्ह्यातील किनारपट्टीलगत 200 मीटरवरील गावातून भूमीगत वीज वाहिन्यांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हाच प्रकल्प पावस विभागात राबवावा व भूमीगत वीज वाहिन्या टाकून ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प एकच्या यशस्वी पूर्ततेनंतर आता प्रकल्प दुसर्या टप्प्यात चालू केला आहे. त्याचा लाभ माझ्या पावस विभागातील सर्व गावांना व्हावा व अखंडित वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी संतोष पोकडे यांनी केली आहे.