मत विभाजनासाठी डावपेचांनी ‘लवंगी’; नामसाधर्म्य 23 उमेदवारांचे अर्ज दाखल
। रायगड । सुयोग आंग्रे |
नावात काय आहे, असे विधान करणार्या शेक्सपिअरला वाटलेही नसेल कि, नावांचा प्रयोग राजकीय पटलावर डावपेच म्हणून केला जाईल. म्हणजेच नावातच सगळं आहे, असे म्हणण्याची वेळ रायगड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान आली आहे. जिल्ह्यातील सात विधानसभांपैकी चार विधानसभांमध्ये मतदारांना बुचकळ्यात टाकण्यासाठी नामसाधर्म्य पॅटर्नचा वापर राजकारण्यांनी केला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पनवेल, उरण, कर्जत आणि अलिबाग या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये नामसाधर्म्य असणार्या तब्बल 23 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये 17 उमेदवार अपक्ष तर 6 उमेदवार राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस 4 नोव्हेंबर आहे. यामुळे पुढील तीन दिवसात नामसाधर्म्याचा फटका बसू नये, यासाठी प्रमुख उमेदवारांनी नामसाधर्म्य उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी अर्थपूर्ण चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.रायगड जिल्हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारा जिल्हा आहे. रायगड जिल्ह्याचे राजकारण कधी कोणत्या बाजूला झुकेल याचा नेम नसल्याचा प्रत्यय अनेकदा रायगडकरांना आला आहे. नामसाधर्म्य उमेदवार उभे करून विरोधकांची डोकेदुखी वाढविण्याचा पॅटर्न रायगड जिल्ह्यात परंपरागत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
2024च्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी नामसाधर्म्य पॅटर्न राबविण्यात आला आहे. यामध्ये पनवेल विधानसभा मतदार संघात प्रशांत ठाकूर , बाळाराम पाटील , कर्जत विधानसभा मतदार संघात महेंद्र थोरवे, सुधाकर घारे, उरण मतदार संघात मनोहर भोईर, प्रीतम म्हात्रे, अलिबाग विधानसभा मतदारसंघात महेंद्र दळवी आणि दिलीप भोईर या नावाच्या 23 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये 17 नामसाधर्म्य उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रशांत राम ठाकूर, अपक्ष प्रशांत काशिनाथ ठाकूर, अपक्ष प्रशांत बाळाराम ठाकूर, शेकापचे बाळाराम दत्तात्रेय पाटील, अपक्ष बाळाराम महादेव पाटील, बाळाराम गौर्या पाटील असे नामसाधर्म्य असणार्या सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. कर्जत विधानसभा मतदार संघात शिंदे शिवसेना पक्षाचे महेंद्र सदाशिव थोरवे, अपक्ष महेंद्र लक्ष्मण थोरवे, सुधाकर परशुराम घारे, अपक्ष सुधाकर शंकर घारे आणि अपक्ष सुधाकर यादवराव घारे अशा नामसाधर्म्य सणार्या पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत.
उरण विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मनोहर गजानन भोईर, अपक्ष मनोहर परशुराम भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम जनार्दन म्हात्रे, अपक्ष प्रीतम धनाजी म्हात्रे आणि अपक्ष प्रीतम बळीराम म्हात्रे या नामसाधर्म्य असणार्या पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेना पक्षाचे महेंद्र हरी दळवी यांच्यासह महेंद्र वसंत दळवी, महेंद्र कृष्ण दळवी, महेंद्र आत्माराम दळवी, भाजपचे बंडखोर दिलीप विठ्ठल भोईर, अपक्ष दिलीप गोविंद भोईर, अपक्ष दिलीप गोविंद भोईर अशा नामसाधर्म्य असणार्या सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
निवडणुकीच्या राजकारणात मतपत्रिकेवर नावेच महत्वपूर्ण ठरतात. कारण चर्चेतल्या नावांचे भांडवल करून निवडणुका लढल्या जातात. रायगडकरांना सध्या याचाच प्रत्यय येतोय. जिल्ह्यात नामसाधर्म्य असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये हा नामसाधर्म्याचा वापर करण्यात आला आहे. याची मोठी किंमत प्रस्थापितांना चुकवावी लागली होती. नामसाधर्म्यामुळे मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण कारायचा आणि त्यांच्या मतांचे विभाजन करायचा हा यामागचा मुळ उद्देश होता. आता ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचे नाव, पक्ष, त्याचे निवडणूक चिन्ह आणि फोटो देखील असणार आहे. त्यामुळे समान नावाच्या उमेदवारांचा फंडा कितपत चालेल, हे निवडणूकीनंतरच स्पष्ट होणार आहे. पण मागील निवडणूकांचा अनुभव लक्षात घेऊन, प्रस्थापितांच्या नावांचे भांडवल करून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण मात्र तेजीत राहणार आहे.