। उरण । प्रतिनिधी ।
शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उरण तालुक्यातील आदिवासी कातकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात येते. यावर्षी सारडे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बेलडोंगरी या आदिवासी कातकरी वडीवर दिवाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात एकूण 25 महिलांना साडी, 27 पुरुषांना कपडे, 12 मुले व 12 मुलींना कपडे, शालेय साहित्य व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य के.ए. शामा यांनी यावेळी गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या आपल्या बांधवांसोबत दिवाळी साजरा करण्याचा उद्देश सर्वांसोबत विशद केला व दिलेली भेट स्वीकारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी आर्थिक मदत केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विशाल पाटेकर, तेजस बाळकृष्ण ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता हिंगमिरे, माजी विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.