पिवळे सोने आणण्यासाठी सर्वत्र लगबग
| चिरनेर | प्रतिनिधी |
यावर्षी सुरुवातीला पाऊस दमदार पडला. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने बरसलेल्या जलधारांमुळे भातशेतीत उत्तम भातपीक आले आहे. दरम्यान, उरण तालुक्यातील भातशेतीतील 140 ते 150 दिवसांचे भातपीक पूर्ण तयार झाले असून, ठिकठिकाणी भातकापणी, बांधणी आणि झोडणीची लगबग सुरू आहे. शेतकरी राजा भातपिकांच्या कापणी, मळणीच्या कामात गुंतला असून, शेतकर्यांना मोठा दिलासा मिळेल असे दिसून येत आहे.
दरम्यान, ओडिशामधील दाना वादळाचा परिणाम महाराष्ट्रात कोकण आणि अन्य भागात होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने बळीराजा पावसाच्या सावटामुळे चिंताग्रस्त आहे. उरणमधील बहुतांशी शेतकर्यांना भातकापणी पुढे ढकलावी, असे वाटत आहे. तापमान वाढलेले असल्याने पाऊस येणार असे अनुमान ज्येष्ठ शेतकरी गोपाळ केणी, दीपक पाटील यांनी व्यक्त केले. उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, मोठीजुई, खोपटे, सारडे, वशेणी, साई, दिघाटी, आवरे, गोवठणे, पाले, पिरकोन तसेच या भागातील विविध गावातील भातशेती लागवडी क्षेत्रावर भातपीक बहरले असून, हे भात पीक कापणी करण्यासाठी पूर्ण तयार झाले असल्याचे येथील शेतकरी बांधवांनी सांगितले.
यंदा भातपीक दसर्याला पूर्णतः तयार झाले असून, तेव्हापासून मिळतील तसे मजूर घेऊन युद्धपातळीवर कापणी, बांधणी व झोडणीच्या कामांची लगबग सुरू आहे. परंतु, शेतमजुरांची संख्या या भागात घटत चालल्याने बहुतांशी शेतकर्यांना भातपिके तयार असूनदेखील उशिरा कापणी बांधणीची कामे करावी लागत आहेत. लहरी पावसामुळे या भागात कापणी करून त्याची उडवी घालून साठवणूक न करता भातपिकांची ताबडतोब झोडणी केली जात आहे. शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, मजूर, अवजारे इत्यादी खर्चाने शेतकर्यांची कंबर मोडून जाते. यावर्षी भातपीक चांगले आले म्हणून शेतकरी राजा आनंदात होता. मात्र, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेवटच्या क्षणाला भातशेतीवर अवकृपा होऊन, नुकसान हे झालेच आहे, अशी माहिती हरिश्चंद्र गोंधळी, कल्पेश म्हात्रे यांनी दिली.