रस्ता खचल्याने काँक्रिट आणि माती यामध्ये पडले भगदाड
| महाड | प्रतिनिधी |
महाड-रायगड रस्त्याचे काम गेली दोन वर्षांहून अधिक काळ संथ गतीने सुरू असून, आजही अपूर्णावस्थेतच आहे. त्यातच या रस्त्याच्या निकृष्टपणाचा नमुना कोंझर गावाजवळ समोर आला आहे. वर झालेले काँक्रिटीकरण आणि मातीचा भराव यामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. काँक्रिटखालील माती खचल्याने ही परिस्थिती निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा महामार्ग आणि महाड-महाप्रळ-पंढरपूर या रस्त्यांप्रमाणेच किल्ले रायगडाकडे जाणारा महाड-रायगड मार्गदेखील गेली दोन वर्षाहून अधिक काळ अपूर्ण अवस्थेतच आहे. पूर्वी असलेल्या डांबरीकरण रस्त्या ऐवजी शासनाने काँक्रीट रस्त्याचे काम मंजूर केले. रस्त्याचे रुंदीकरण करत असताना यामध्ये असलेले भले मोठे वृक्षदेखील तोडण्यात आले. सुरुवातीला हे काम एल बी पाटील कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र या कंपनीकडून कामाला वेग दिला गेला नसल्याने शासनाने अक्षय कंट्रक्शन कंपनीला हे काम दिले. अक्षय कन्स्ट्रक्शननेदेखील आधीच्या कंपनीचे रि वाढवण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपासून अक्षय कंट्रक्शन या रस्त्याचे काम करत आहे. जागोजागी झालेले खोदकाम आणि ठराविक टप्प्यांवर काँक्रीट करून सोडून दिलेले काम यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह किल्ले रायगडावर येणार्या शिवप्रेमींना आणि पर्यटकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम सुरू असताना वाहन चालकांना आणि प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी कंट्रक्शन कंपनीने घेतली पाहिजे. मात्र, जागोजागी पडलेली खडी, खड्डे, माती यामुळे अपघातांची संख्यादेखील वाढली आहे.
शिवा पुण्यतिथी शिवराज्याभिषेक शिवजयंती आणि इतर सोहळ्यांसाठी किल्ले रायगडावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल होत असतात. वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि लागणारा वेळ याकरिता रस्त्याच्या रुंदीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेऊन हे काम हातात घेतले होते. मात्र अक्षय कंट्रक्शनकडून महाड रायगड रस्त्याबरोबरच महाप्रळ पंढरपूर या रस्त्याचे कामदेखील घेण्यात आले आहे. यामुळे दोन्ही रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. महाड रायगड मार्गावरील आणि महाप्रळ मार्गावरील गावातील नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. गडावर होणार्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी अनेक मान्यवर आणि शिवप्रेमी दाखल होत असतात. अशावेळी शासनाकडून या रस्त्यांची कामे त्वरित करून घेण्यासाठी कंट्रक्शन कंपनीकडे तगादा लावला जात आहे. यामुळे दिवस-रात्र काम करून कंट्रक्शन कंपनी गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून काम करून घेत आहेत. याचा प्रत्यय कोंझर गावाजवळ आला आहे. यापूर्वी नातेखिंड ते लाडवलीयादरम्यान रस्ता खचून गेल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे ऐन पावसाळ्यात लाडवली पुलाचे काम अर्धवट राहिल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले होते. अशीच काहीशी परिस्थिती कोंझर गावाजवळ निर्माण झाली आहे. या ठिकाणी श्री शिवराज्याभिषेकापूर्वी घाईघाईने काँक्रिटीकरणाचे काम केले गेले होते. यामुळे या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. झालेले काँक्रीट आणि त्या खालील मातीचा भराव यामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. माती खचली गेली असल्याचे स्पष्ट दिसत असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भाग दिसून येत आहे. यावरून दिवस-रात्र वाहनांची ये जा सुरू आहे. वरून काँक्रीट रस्ता दिसत असला तरी खाली निर्माण झालेल्या पोकळीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता तुटून या ठिकाणी अपघात झाल्यास सदर कन्ट्रक्शन कंपनी जबाबदार असेल, असे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.