चारिझेन व रेड हाऊस फाऊंडेशनची सामाजिक बांधिलकी
| माणगाव | प्रतिनिधी |
दिवाळी सर्वत्र आनंदाने साजरी होत असताना ज्या वाडी, वस्ती, पाड्यावर दिवाळी साजरी होत नाही, ज्या ठिकाणी दिवाळीनिमित्ताने तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने नेहमीच ओढाताण असते, अशा ग्रामीण वाडी-वस्तीवर चारिझेन फाऊंडेशन व रेड हाऊस फाऊंडेशन यांनी आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे वाटप करुन त्यांनी दिवाळी उबदार केली.
दिवाळीनंतर थंडीच्या मोसमाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. हिवाळी ऋतूत वाडी वस्तीवर राहणार्या आदिवासी बंधूंना उबदार कपड्यांची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन चारीझेन फाऊंडेशन व रेड हाऊस फाऊंडेशनने आदिवासींसाठी उबदार असे ब्लँकेटचे वाटप केले. थंडीच्या दिवसात या दिवाळी भेटीचा आदिवासी बंधूंना निश्चितपणे उपयोग होणार आहे. तालुक्यातील पेणतर्फे तळे आदिवासवाडी व इतर आदिवासी वाड्यांवर फाऊंडेशनच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
थंडीच्या दिवसांसाठी या उबदार ब्लँकेटचा निश्चितच आदिवासी बांधवांना उपयोग होणार असल्याची भावना वाडी-पाड्यावरील आदिवासी बंधूंनी व्यक्त केली. या ब्लँकेट वाटपासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन एन.एस. रंधावा, उपाध्यक्ष सतीश काळे, मार्केटिंग हेड राकेश पडवळ, सहकारी किशोर झेमसे आदी मान्यवर उपस्थित होते.