। मुंबई । प्रतिनिधी ।
यंदा राज्यासह देशात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच, दिवाळीच्या चार ते पाच दिवसांत लखलखाट पाहायला मिळाला. तर, फटाक्यांची आतिषबाजी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. यामुळे आता हवेतील प्रदुषणात कमालीची वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी फटाक्यांचा आवाज जरी कमी झाला असला तरी मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांना वायु प्रदुषणाचा विळखा बसत असल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.
यंदा दिवाळीच्या या चार दिवसांत फटाक्यांमुळे प्रदूषणात आणखीन भर पडल्याचे निरीक्षण डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदविले आहे. तर, सर्वाधिक प्रदुषणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घोडबंदर रोडवर झाल्याचे निदर्शनात आले आहे. या ठिकाणी फटाक्यांचे आवाज आणि वायू प्रदूषण अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. यातच मुंबईत वार्याचा वेग कमी झाल्यामुळे हवेतील प्रदुषण झपाट्याने वाढू लागले आहे. यामुळे आता फुफ्फुसाच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाल्याने डॉक्टर काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.
हवेतील प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, महापालिकेचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 135 म्हणजेच धोकादायक पातळीवर होती. यासोबतच कुलाब्यात 155 म्हणजेच समाधानकारक एक्यूआय नोंदवण्यात आला होता. तर, माझगावमध्ये 89 एक्यूआय होता. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकात वाढ झाल्यामुळे आकाशात धुक्याचा दाट थर दिसून येत आहे. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकात वाढ झाल्यामुळे आकाशात धुक्याचा दाट थर दिसून येत असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे आता लहान मुलांमध्ये अॅलर्जी होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.