। मुंबई । प्रतिनिधी ।
भाईंदर येथील उत्तन मार्गावरील डोंगरी परिसरात महापालिकेच्या परिवहन बसने रिक्षाला धडक दिली. हा अपघात सोमवारी (दि. 04) मध्यरात्री घडला असून यात 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर, रिक्षाचालकासह त्याची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात उत्तन मार्गावर डोंगरी स्टॉपच्या वळणावर सोमवारी (दि. 04) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला. रिक्षाचालक बाला राजभर हे रिक्षाने आपल्या कुटुंबासह चौक येथील घरी जात होते. दरम्यान, डोंगरी बस स्टॉपच्या वळणावर उत्तन येथून भाईंदरकडे जाणार्या पालिकेच्या परिवहन बसने रिक्षाला धडक दिली. यात रिक्षाचालकाचा भाऊ पंकज (18) याचा मृत्यू झाला. तर, रिक्षाचालकासह त्याची पत्नी अनिता व मुलगी अनिषा हे गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, याप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी बसचालकावर गुन्हा दाखल केला असून बसचालकाला ताब्यात घेतले आहे.