। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदार संख्या 22 लाख 92 हजारांवर पोचली असून अखेरच्या तीन दिवसांमध्ये तब्बल 26 हजार मतदारांची वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात 1 लाख 43 हजार 552 मतदार वाढले असून नालासोपारा आणि बोईसर विधानसभा क्षेत्रातील मतदारांची वाढ लक्षणीय झाली आहे.
पालघर जिल्ह्यात 11 लाख 87 हजार 589 पुरुष, 11 लाख 4 हजार महिला आणि 231 तृतीयपंथी मतदार असून नालासोपारा मतदार संघामध्ये सर्वाधिक 6 लाख 8 हजार पेक्षा अधिक मतदार आहेत. या खालोखाल बोईसर मतदार संघात 4 लाख 11 हजार, वसई विधानसभा क्षेत्रात 3 लाख 54 हजार, विक्रमगड मतदारसंघात 3 लाख 17 हजार, डहाणू विधानसभा क्षेत्रात 3 लाख 1 हजार तर पालघर विधानसभा क्षेत्र 2 लाख 98 हजार मतदार आपला हक्क बजावू शकणार आहेत.
46 हजार नवे मतदार
जिल्ह्यात 46 हजार नव मतदारांची नोंदणी झाली असून 20 ते 49 वयोगटात तब्बल 66 टक्के मतदार नोंदवले गेले आहेत. नोंदवलेल्या मतदारांपैकी 17 हजार 432 मतदार अपंग आाहेत. याचप्रमाणे सैन्यामध्ये कार्यरत असणारे 326 मतदार असून त्यापैकी विक्रमगड मध्ये 121 तर नालासोपारामधील 83 सैन्यातील कर्मचार्यांचा समावेश आहे.