गडकिल्ल्यात आई मातोश्री ग्रुप, तर रांगोळी स्पर्धेत काशिश कडू प्रथम
| उरण | वार्ताहर |
महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांची सर्वांना ओळख व्हावी, गडकिल्लेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना ज्ञात व्हावा, गड किल्ल्यांचे जतन व्हावे, संरक्षण संवर्धन व्हावे या दृष्टीकोनातून गड किल्ले स्पर्धाचे तसेच रांगोळी कलेविषयी जनजागृती व्हावी, नवनवीन कलाकार तयार व्हावेत. हे कलाकार राष्ट्रीय पातळीवर चमकावेत या दृष्टीकोनातून रांगोळी स्पर्धेचे आयोजन युवा संघटना सोनारीच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक मंदिर, सोनारी, उरण तालुका येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
स्पर्धेतील विजेत्या उमेदवारांना बक्षीस, सन्मानचिन्हे, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सत्या कडू, राकेश नरेश कडू, दिपक चिंतामण कडू, सुरेश कडू, हितेश कडू, अंकुश तांडेल, प्रशांत कडू आदी मान्यवर उपस्थित होते. युवा संघटना सोनारीतर्फे आयोजित केलेल्या गडकिल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक आई मातोश्री ग्रुप सोनारी, द्वितीय क्रमांक लव्या म्हात्रे, कृपा म्हात्रे मनन म्हात्रे यांनी, तर तृतीय क्रमांक जय शिवराय ग्रुप सोनारी यांनी पटकविला. तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक काशिश कडू, द्वितीय क्रमांक स्मिता भोईर, तृतीय क्रमांक वांशिका तांडेल यांनी पटकाविले. या कार्यक्रमासाठी युवा संघटना सोनारी व राकेश कडू मित्र परिवाराच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी मेहनत घेतली. युवा संघटना सोनारी यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून समाजामध्ये एक संदेशदेखील दिलेला आहे आपली संस्कृती परंपरा गडकिल्ले त्यांचा इतिहास यांची माहिती व त्यांचा जतन संवर्धन येणार्या पिढीकडून व्हावे हाच स्पर्धेच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. युवा संघटना सोनारी यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला जनतेचाही उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धकांनी, नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.