। लातूर । वृत्तसंस्था ।
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धीरज देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने निवडणूक जाहीर होण्याअगोदरपासून हा मतदारसंघ पिंजून काढला. आमदार धीरज देशमुख यांच्यासह माजी मंत्री दिलीपराव देशमुख, वैशालीताई देशमुख, दीपशिखा देशमुख आदींनी गावोगाव गाठीभेटी-मेळावे घेऊन वातावरण निर्मिती केली. पहिल्या टप्प्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. भाजपला सूर गवसला नसल्याने पक्षाच्या अनेक पदाधिकार्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेस जो उमेदवार देईल, तोच उमेदवार या मतदारसंघात निवडून येतो, हा इतिहास आहे. लातूर तालुक्यासह रेणापूर तालुका आणि औसा तालुक्यातील 27 गावे मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांत झालेली विकासकामे आणि जनतेशी असलेला थेट संपर्क यांच्या जोरावरच काँग्रेसने सलग तीन वेळा जिंकली आहे.
लातूर ग्रामीणला यंदा तुल्यबळ लढत, काँग्रेसविरुद्ध भाजप विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मांजरा परिवारातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून या भागाचा कायापालट झाला आहे. कोट्यवधींची विकासकामे झाली आहेत.
विकासकामे आणि विविध कार्यांतून देशमुख सातत्याने मतदार आणि गावांच्या संपर्कात आहेत. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगाव गाठीभेटी, नागरिकांशी थेट संवाद, महिला मेळावे, आदी माध्यमातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार धीरज देशमुख, माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांशी थेट संवाद साधत आहेत. तसेच वैशालीताई देशमुख, दीपशिखा देशमुख यांनीही गावोगाव महिलांशी संवाद साधला आहे.