रामदास आठवलेंची खोचक टीका
। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता दिली तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी अमरावती येथे एका जाहीरसभेदरम्यान केले होते. या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांनी एएनआय वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरेंच्या विधानावर टीका केली. मशिदीवरील भोंगे कधीही हटणार नाहीत, अशी भूमिका मांडत असताना रामदास आठवले यांनी मनसेची सत्ता कधीही येणार नाही, असे सांगितले. मनसेचा एकच आमदार निवडून येतो, तोही स्वतःच्या जीवावर निवडून येतो, असेही आठवले म्हणाले.
रामदास आठवले एएनआयशी बोलताना म्हणाले की, राज ठाकरे वारंवार अशाप्रकारचे विधान करत असतात. आमचे सरकार आले तर मशिदीवरील भोंगे हटविणार असे ते म्हणतात. पण मशिदीवरील भोंगे हटणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येऊ शकत नाही. कितीही वर्ष गेले तरी राज ठाकरेंची सत्ता येऊ शकत नाही. त्यांचा एकच आमदार निवडून येतो, तोही स्वतःच्या जीवावर. मग त्यांचे सरकार कसे येणार? आणि ते कसे भोंगे हटवू शकणार?
मी दहशतवादी असलेल्या मुसलमानांचा नेहमीच विरोध केला आहे. पण देशावर, भारताच्या संविधानांवर प्रेम करणारे आणि हिंदूंशी बंधुभाव राखून राहणार्या मुसलमानांचा विरोध करणे ठिक नाही. मशिदीत एक-दोन मिनिटांची अजान होत असते, त्यासाठी भोंगे हटविण्याची काय गरज आहे. भोंगे हटविण्यापेक्षा गरीबी हटवा, भ्रष्टाचार हटवा, जातीयता हटविली पाहिजे. केवळ 140 145 उमेदवार उभे करून आमदार निवडून येत नसतात. मनसेचे दोनही आमदार निवडून येणार नाहीत. पण राज ठाकरे असे विधान वारंवार करत राहिले, तर माझा पक्ष भोंगे हटविणार्यांना धडा शिकवल्या राहणार नाही, असेही रामदास आठवले म्हणाले.