विकास कामांवर भर देण्याचे आश्वासन
। वाघ्रण । वार्ताहर ।
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग-मुरुड आणि रोहा मतदार संघाच्या महाविकास आघाडी तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांनी गुरुवारी (दि.7) शहापूर जिल्हा परिषद मतदार संघातील शेखाचे गाव, वाघ्रण, चिंचवली, नारंगी, बहीरिचा पाडा व शिरवली आदी भागात प्रचारदौरा केला. यावेळी प्रत्येक ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी चित्रलेखा पाटील यांचे जोरदार स्वागत करून सभा घेतल्या.
यावेळी चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी बोलताना सांगितले की, येथील गरजू मुलींना सायकली वाटप केल्या आहेत. नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप केले आहेत, असेच कार्य पुढेही करत राहू. तसेच, विजयी झाल्यावर येथील महिला व शेतकरी बांधवाच्या समस्या सोडवू, नाट्य परंपरेला हातभार लावू, महिलांना पुढे जाण्यासाठी त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य ती मदत करू. याचसोबत विद्यार्थी आणि खेळांडूसाठी सहकार्य करून एकूण विकास कामांवर भर देण्याचे आश्वासन चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी दिले आहे. पुढे बोलताना त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, मा. आ. पंडीत पाटील, मा. मंत्री स्वर्गीय मिनाक्षी पाटील यांनी केलेल्या विकास कामांचा उल्लेखदेखील केला आहे. याचबरोबर महाविकास आघाडीचे उपस्थित कार्यकर्ते पाठीशी असल्याबदल त्यांचे आभारदेखील व्यक्त केले.
दरम्यान, अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात झालेल्या सभेत चित्रलेखा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक करताना दिपक पाटील यांनी वाघ्रण व खारपेढांबे गावांच्यावतीने चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी मागील पाच वर्षात केलेल्या शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, बचत गट, सामाजिक उपक्रम याबद्दल सांगितले. यावेळी, सरपंच राजेंद्र पाटील, अॅड. गौतम पाटील, माजी सरपंच डॉ. प्रेरणा म्हात्रे, अनिल पाटील आदींसह महिला व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.