रोहामधील 26 गावांतील जलजीवन योजना ठप्प
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रोह्यामधील 26 गावांतील नागरिकांना जलजीवन योजनेंतर्गत घरामध्ये 24 तास पाण्याचे आश्वासन आमदार महेंद्र दळवी यांनी दिले होते. कुंडलिका नदीतून पाणी आणून त्याचे शुद्धीकरण करून ते वर्षभरात घरापर्यंत पोहोचविले जाईल, असेदेखील सांगण्यात आले. परंतु, आश्वासनाची पूर्ती करण्यास दळवी अपयशी ठरल्याची चर्चा गावागावात सुरु आहे. शेकापचे नेते माजी आ. पंडित पाटील यांच्या काळात भातसई, धोंडखारपर्यंत अनेक गावांना एमआयडीमार्फत पाणी मिळत होते. परंतु, या पाच वर्षांत दळवींच्या काळात ही गावे एमआयडीच्या पाण्यापासून वंचित राहिली असल्याचे सांगण्यात आले आहे.
रोहा तालुक्यातील पडम, खारापटी, निडी, भातसई, झोळांबे, झोळांबे कोपरे, लक्ष्मीनगर, शेणवई, डोंगरी, शेणवई आदिवासीवाडी, वावेखार, वावेपोटगे, यशवंतखार, करंजवीरा, सानेगाव, दापोली, कोपरी, धोंडखार आदी 26 गावे कुंडलिका तीराजवळ वसली आहेत. या गावांना मार्च महिन्यापासून पावसाळा सुरु होईपर्यंत पाण्याची टंचाई कायमच भेडसावत आहे. पाण्यासाठी दोन दोन किलोमीटर पायपीट करावी लागते.
रोहा तालुक्यातील 26 गावांना पाणीपुरवठा योजनेचे सर्वतोपरी दायित्व हे महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाचेच आहे. त्यामुळे 26 गावे पाणीपुरवठा योजना पूर्ण करून देखभालही एमआयडीसीनेच करायची असल्याचे ठाम मत शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये जि
ल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत मांडले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व 26 गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामुळे त्यावेळी एमआयडीसीमार्फत गावांना पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली होती.
विद्यमान आमदार दळवी यांनी 26 गावांसाठी जलजीवन योजना सुरु करण्याचे आश्वासन दिले. त्याची बॅनरबाजीदेखील आमदारांनी केली होती. मात्र, अजूनपर्यंत हे काम अपूर्णच असल्याचे चित्र आहे. गावातील रस्ते खोदून पाईप टाकण्यात आले आहेत. तेदेखील अपूर्ण स्थितीत आहेत. गावांमध्ये साठवण टाकी तसेच जलशुध्दीकरण केंद्राचा अभावदेखील आहे. रोह्यामधील 26 गावांतील जलजीवन योजना ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. घरामध्ये 24 तास मुबलक पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन आमदारांनी दिले होते. मात्र, अजूनपर्यंत या योजनेचे कामच पूर्ण झाले नसल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.
शुद्धीकरण केंद्रासाठी जागेचा अभाव
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलजीवन योजनेंतर्गत 38 कोटींची ही योजना असून, 24 हजार 285 लोकसंख्या असलेल्या या गावांतील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. शुध्दीकरण केंद्रासाठी जागेचा अभाव आहे. जागा उपलब्ध झाल्यास तातडीने शुध्दीकरण केंद्र उभे केले जाईल.
शेकापमुळेच गावात पाणी
कुंडलिका तीराजवळ गावे, वाड्या असतानाही अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. पंडित पाटील यांच्यामुळे भातसई गावामध्ये पाणी आले आहे. शेणवई आदिवासीवाडीमध्येदेखील पाणी शेतकरी कामगार पक्षामुळेच आले असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले.