। उरण । प्रतिनिधी ।
उरण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदाराच्या नाकर्तेपणामुळे तालुक्याचा विकास रखडला असून या तालुक्याला पुन्हा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मतदाराचा विश्वास सार्थ ठरवू, असे प्रतिपादन उरण विधानसभा मतदार संघातील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी केले आहे. विधानसभा निवडणूक प्रचारार्थ पागोटे येथे प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना प्रीतम म्हात्रे म्हणाले की, पागोटे क्रांतिवीरांची भूमी आहे. मात्र, या भूमीतील नागरीकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. उरणच्या विद्यमान आमदारांचे या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या पाच वर्षात ते इकडे फिरकलेदेखील नाहीत. यानंतर आता निवडणुक समोर दिसताच त्यांनी थापा मारण्यास सुरूवात केली आहे. ते रस्त्याबद्दल बोलत नाहीत, पाण्याबद्दल बोलत नाहीत. येथील आगरी, कोळी समाजाच्या समस्यांबद्दल बोलत नाहीत. तर, अटल सेतूबद्दल बोलतात. आगरी, कोळी समाजाचा अवमान होईल, असे ते बोलतात. यामुळे या निवडणुकीत शिट्टी या चिन्हापुढील बटण दाबून मला विजयी करा, असे आवाहन प्रीतम म्हात्रे यांनी केले आहे.
यावेळी बंडाशेठ, जितेंद्र म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, शिपाजी काळे, महेश साळुंखे आणि शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.