। उरण । प्रतिनिधी ।
निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगात आली असून शेकापचे उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या पाठीशी पूर्ण तरूणाई ताकतीनिशी एकवटली आहे.
उरण विधानसभा मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी प्रचार रॅलीच्या निमीत्ताने पागोटे, वेश्वी, दादरपाडा, फुंडे, बोकडविरा, करंजा, न्हावाशेवा गावाचा झंझावाती दौरा केला. या दौर्यात प्रीतम म्हात्रे यांच्यासाठी स्वत:ला प्रचाराच्या कामात झोकून दिलेल्या तरूणाईमुळे प्रचारात वेगळीच रंगत आली असून शेकापची हवा निर्माण झाली आहे. प्रीतम म्हात्रे यांनी या भागात घेतलेल्या आघाडीमुळे सर्वत्र जल्लोशपूर्ण वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान, उरणच्या विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षात तालुक्याच्या प्रश्नाकडे लक्ष न देता आमदारकीचा वापर केवळ स्वत:ची तिजोरी भरण्यासाठीच केल्याने जनता त्यांच्यावर नाराज आहेत. अशा बिनकामी आमदाराला घरी बसवून तालुक्याचा विकास साधण्यासाठी अवघी तरूणाई प्रीतम म्हात्रे यांच्यामागे एकवटली आहे. कॉर्नर सभांनी तालुक्याचा विकास आणि बेरोजगारीवर प्रकाश टाकत विद्यमान आमदाराच्या अपयशावर अचूक बोट ठेवले आहे. यामुळे संपूर्ण तरूणाई प्रीतम म्हात्रे यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.