। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन सावंत यांना सर्वसामान्य स्तरातून पाठिंबा मिळत आहे. यातच राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या ऑल इंडिया पँथर सेनेने जाहीर पाठिंबा दिला असून या आशयाचे पत्र नितीन सावंत यांना शिवालय मध्यवर्ती कार्यालयात देण्यात आले आहे.
ऑल इंडिया पँथर सेना ही संपूर्ण भारतभर सामाजिक चळवळ उभारत अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे. या सेनेचे सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम असल्याने अनेक जण या संघटनेला जोडले गेल्याने मोठी टीम या सेनेत काम करीत आहे. तर, ही सेना नेहमीच सत्याच्या बाजूने उभी राहण्याचे काम करीत असून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या कामावर विश्वास ठेवून त्यांना कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी बिन शर्त पाठिंबा दिला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत, ऑल इंडिया पँथर सेना रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड, कर्जत तालुकाध्यक्ष मारुती जाधव, युवासेना जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख दिनेश घाडगे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.