चित्रालेखा पाटील उर्फ चिऊताई कडाडल्या
| रोहा | वार्ताहर |
मागील निवडणुकीत मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करून खोटी आश्वासने देऊन त्यांनी आमदारकी मिळवली. मात्र, निवडून आल्यानंतर आमदरांनी जनतेला वार्यावर सोडले. आमदार खोक्यांसाठी गुवाहाटीला तर इथले उद्योग गुजरातला गेले. त्यामुळे तरुण बेरोजगारांची संख्या कैक पटीने वाढली. स्वतः आमदार त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सत्ता असताना या भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची आमदारांनी कार्यतत्परता दाखवली नाही. या भागातील लोकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. लाडक्या बहिणींना हंडाभर पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. अनेक लोकोपयोगी कामे प्रलंबित आहेत. अशा निष्क्रिय आणि अकार्यक्षम आमदारांमुळे अलिबाग-मुरुड आणि रोहा तालुक्यातील जनतेने पाच वर्षे अक्षरशः वनवास भोगलाय, अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी हल्लाबोल करत आ. महेंद्र दळवी यांचा समाचार घेतला. या वनवसातून मुक्ती मिळविण्यासाठी व मला विधानसभेत पाठवून आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले.
रोहा तालुक्यातील आरे गावात मंगळवारी (दि. 12) रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच राजेंद्र मळेकर, संचालक गणेश मढवी, पाखर अण्णा, बाळाराम पाटील, वसंत गोरीवले, खारगाव ग्रा.पं. सदस्या शिल्पा नरेंद्र पाटील, मोरेश्वर गायकर, तुकाराम शिंदे, राजेंद्र आंबिलकर, रामचंद्र साळवकर, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मला अनेक जण सांगतात राजकारण म्हणजे पैशांचा खेळ आहे. पण, शेकाप निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शेकापचा कार्यकर्ता कापला तरी बेईमान होणार नाही. ग्रामस्थ आणि कार्यकर्ते एकनिष्ठ, धाडसी आणि एक झेंड्याखाली असल्याने हीच पक्षाची मोठी ताकद असल्याच मतं चिऊताई पाटील यांनी व्यक्त केले. मी सावित्रीची लेक आहे, माझ्या डोक्यावर पाखर अण्णा आणि मळेकर काका यांच्यासारख्या ज्येष्ठांचा हात आणि जनतेची साथ आहे. त्यांच्या हिमतीवर आज सूनबाई म्हणून मी निवडणूक लढवतेय. तुमचे पाठबळ आणि ताकद माझ्या पाठीशी असल्यामुळे माझा विजयी निश्चित असल्याचा दावा चित्रलेखा पाटील यांनी केला आहे.
दलबदलू आमदार आणि अपक्ष उमेदवार यांच्या भूलथापांना बळी पडू नका. ते आज आहेत, उद्या नसतील. शेकापची चौथी पिढी तुमची सेवा करत आहे. म्हणूनच तुमची सूनबाई विधानसभेत काम करणार आहे. 2014 ते 2019 साली तत्कालीन आमदार आणि माझे सासरे पंडित पाटील यांनी अनेक विकासकामे केली आहेत. मी पण त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांना अभिमान वाटेल इतकी विकासकामे करण्यासाठी बांधील आहे.
– चित्रलेखा पाटील