। नवी मुंबई । वृत्तसंस्था।
बेलापूर विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार विजय नाहटा यांना मदत करणार्या पक्षातील सात प्रमुख पदाधिकार्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. नाहटा यांच्या बंडखोरीला साथ देऊ नका अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. त्यानंतरही नाहटा यांना साथ देणार्या पदाधिकार्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपने मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली असून त्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बंडखोरी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. महायुतीतील भाजपमध्ये हे बंड सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनीही बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. संदीप नाईक यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी काही दिवस अगोदर नाहटा यांनी एका जाहीर कार्यक्रमात आपण शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, संदीप नाईक यांच्या बंडाचा सुगावा लागताच शरद पवार यांनी नाहटा यांचा प्रवेश थांबिवला.
बंडखोरीच्या या वातावरणात शिवसेना (शिंदे) पक्षातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी जाहीरपणे नाहटा यांच्याबरोबर दिसू लागले होते. यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली होती. मुख्यमंत्र्यांनीदेखील हे बंड खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशारा दिला होता.
विजय नाहटा यांच्या बंडाला पक्षाचे शहरप्रमुख विजय माने आणि नेरुळ भागातील माजी नगरसेवक दिलीप घोडेकर यांनी साथ दिली होती. महायुतीच्या वाशी येथील मेळाव्यात माने आणि घोडेकर दोघेही उपस्थित राहिले. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी हकालपट्टीचे आदेश काढताना माने यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. दिलीप घोडेकर यांची मात्र पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय नाहटा यांचे कडवे समर्थक सानपाडा विभागाचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सुर्यराव, नेरुळचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, तुर्भे विभागप्रमुख अतिश घरत, वाशी सहसंपर्क प्रमुख कृष्णा सावंत, सानपाडा उपविभागप्रमुख देवेंद्र चोरगे आणि सानपाडा विभागप्रमुख संजय वासकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.