| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील यांना महाराष्ट्र मच्छिमार सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेचे मुख्य संघटक मंगेश कोळी आणि संतोष पाटील यांनी आपल्या पाठिंबाचे पत्र शेकापचे युवानेते आदित्य बाळाराम पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यादरम्यान झालेल्या चर्चेमध्ये कोळी समाजाच्या अनुसूचित जमातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र, मत्स्य व्यवसायाला ऊर्जीतावस्था आणण्यासाठी सकारात्मक धोरण, कोळीवाड्याचे सीमांकन, मच्छी मार्केटचे आधुनिकीकरण, रोजगार स्वयंरोजगारासाठी स्थानिक भूमीपुत्र म्हणून प्रथम प्राधान्य, सुसज्ज बंदरे, शीतगृहे, कोळीवाड्यातील रस्ते आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र मच्छिमार सेनेने बाळाराम पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा दिला असून, आम्ही सर्वजण आपल्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेऊ, असे आश्वासन दिले.