किनारी असलेल्या 99 गावांना धोका; सतर्क राहण्याचे आवाहन
| रायगड | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यामध्ये यावर्षी 24 वेळा उंच लाटा उसळणार आहेत. 14 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत समुद्रात मोठी भरती येऊन 4.50 मीटर ते 4.89 मीटर इतक्या उंच लाटा किनारी आदळणार आहेत. समुद्र व खाडी किनारी असलेल्या 99 गावांना या लाटांचा धोका असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्याला 240 किलो मीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मांडवा, रेवस, आक्षी, नागाव, किहीम, वरसोली, अलिबाग, रेवदंडा, बोर्ली, मुुरूड, काशीद, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर अशा अनेक समुद्रकिनारी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या अखत्यारित सुमारे 11 सागरी पोलीस ठाणे आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेने निम्मे नागरीक समुद्र आणि खाडी किनारी राहणारे आहेत. जिल्ह्यामध्ये 132 पुरप्रवण गावांचा समावेश आहे. त्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावरील 99 गावे आहेत. जिल्ह्यामध्ये 14 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत समुद्राला मोठी भरती येणार आहे. या कालावधीत किनारी उंच लाटा उसणार आहेत. 12 दिवसामध्ये 4.50 मीटर ते 4.68 मीटर उंच तसेच आणखी 12 दिवसात 4.73 ते 4.89 मीटर उंच लाटा येणार आहेत.
जून महिन्यात 14 ते 19 या सहा दिवसांच्या कालावधीत 4.64 मीटर ते 4.87 मीटर उंच लाटा किनारी धडकणार आहेत. जूलै महिन्यात 13 ते18 जूलै या सहा दिवसाच्या कालावधीत 4.53 ते 4.89 मीटर उंच लाटा येणार आहेत. ऑगस्ट महिन्यात 12 ते 16 ऑगस्ट या पाच दिवसांच्या कालावधीत 4.50 ते 4.83 मीटर उंच लाटा असणार आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये 10 ते 13 सप्टेंबर या कालावधीत 4.51 ते 4.65 मीटर उंच तसेच 28 ते30 सप्टेंबर या कालावधीत 4.51 ते 4.59 मीटर उंच लाटा येणार आहेत. दिवसा 20 दिवस आणि मध्य रात्री चार दिवस या लाटा येणार असून त्यांची वेळ 11.14 वाजल्यापासून दुपारी 3 वाजून 32 मिनीटांच्या दरम्यान असणार आहेत. समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना या लाटांचा धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एक जूलैला एनडीआरएफ होणार दाखल
जिल्ह्यामध्ये जूलै महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस पडतो. सावित्री, कुंडलिका, अशा अनेक नद्या उग्र रुप धारण करतात. त्यामुळे पुरपरिस्थिती निर्माण होते. जूलैमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ दलाला पाचारण केले आहे. एक जूलैपासून रायगड जिल्ह्यातील महाड येथे हे दल स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुनर्वसनाचे 25 प्रस्ताव धुळखात
डोंगरमाथ्यासह पायथ्याशी असलेल्या गावांवर दरडीचे संकट अनेकवेळा आले आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये, जई, कोंडीवते, इरसाल वाडीवर दरड कोसळून जीवीतहानी व वित्तहानी झाली होती. या पार्श्वभूमीवर दरडप्रवण क्षेत्रातील गावांचे भौगोलिक सर्वेक्षण भुवैज्ञानिक मार्फत करण्यात आले. त्यानुसार 25 दरडप्रवण गावांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार करून शासनाला पाठविला आहे. मात्र हा प्रस्ताव अद्यापही धुळखात पडून असल्याचे बोलले जात आहे.





